संरक्षण मंत्रालयाने केले अनिल अंबानींच्या कंपनीचे २५०० कोटींचे कंत्राट रद्द

- २०११ ला झाला होता करार

Anil Ambani

नवी दिल्ली : अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या अनिल धीरुभाई अंबानी समूहाला (ADAG) देण्यात आलेले २५०० कोटींचे कंत्राट संरक्षण मंत्रालयाने (Defense Ministry) रद्द केले आहे. आर्थिक संकटात सापडलेले अनिल अंबानी यांना हा आणखी एक मोठा झटका आहे. रिलायन्स नेवल अँड इंजिनीअरिंग लिमिटेड (आरएनईएल) आरएनईएल भारतीय नौदलाला गस्तीसाठीची जहाजे तयार करून देणार होती. ‘आरएनईएल’ला नियोजित वेळेत ही जहाजे देता आली नाहीत. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने आरएनईएल कंपनीचे कंत्राटच रद्द केले. सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाने दोन आठवड्यांपूर्वीच या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते.

२०११ ला झाला होता करार

नौदलाला गस्तीसाठीची पाच जहाजे पुरवण्याच्या हा करार रिलायन्स आणि नौदलामध्ये २०११ साली झाला होता. यानंतर रिलायन्सने गुजरातमधील जहाज बांधणीचा कारखाना खरेदी केला होता. पण नंतर रिलायन्स उद्योगाची गाडी घसरत गेली. दिवाळखोरीच्या मार्गावर अनिल अंबानी यांच्या मालकीच्या इतर कंपन्यांप्रमाणे रिलायन्स नेवल अँड इंजिनीअरिंग  लिमिटेडही (आरएनईएल) कर्जाच्या मोठ्या ओझ्याखाली दबलेली आहे. राष्ट्रीय कंपनी लवादाने ‘आरएनईएल’च्या दिवाळखोरी प्रक्रियेला मंजुरी दिली होती. या कंपनीच्या डोक्यावर सुमारे ४३,५८७ कोटींचे कर्ज आहे.

खरेदीसाठी अनेक कंपन्या उत्सुक

दिवाळखोरीत निघालेली  रिलायन्स नेवल अँड इंजिनीअरिंग   लिमिटेड (आरएनईएल) खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. यामध्ये एपीएम टर्मिनल्स, युनायटेड  शिपबिल्डिंग कॉरपोरेशन (रूस), हेजल मर्केंटाइल लिमिटेड, चौगुले ग्रुप, इंटरप्स (अमेरिका), नेक्स्ट ऑर्बिट वेंचर्स, एआरसीआईएल, आईएआरसी, जेएम एआरसी, सीएफएम एआरसी, इन्वेंट एआरसी आणि  फियोनिक्स एआरसी यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER