
मुंबई : कर्जात पूर्णपणे बुडलेले उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी येस बँकेला आपले हेड ऑफिस विकले आहे. त्यांनी मुंबई येथील मुख्य कार्यालय येस बँकेला १,२०० कोटी रुपयांना विकल्याची माहिती पुढे आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या व्यवहारातून आलेल्या पैशांचा उपयोग हा येस बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी केला जाईल.
यापूर्वी २०२० मधील जुलै महिन्यातच येस बँकेने रिलायन्स इंफ्राच्या मुख्यालयावर कब्जा केला होता. त्यानंतर रिलायन्स इंफ्राने कार्यालय विकल्याची अधिकृतपणे घोषणा आज केली. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इंफ्रा कंपनीवर असलेल्या २,८९२ कोटी रुपयांच्या वसुलीकरिता बँकेना वित्तीय कारवाई केली होती.
कोणत्याही बँकेला एखाद्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करायची असेल तर त्याआधी दोन महिने नोटीस द्यावी लागते. ही प्रक्रिया बँकेने याआधीच पार पाडली होती. त्यानंतर दबाव वाढल्यामुळे अधिकृतपणे अंबानी यांच्या कंपनीने मुख्य कार्यालय विकल्याचे जाहीर केले. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीवर वेगवेगळ्या बँकांचे एकूण ३,५१५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी बंधू मुकेश अंबानी यांची अनिल अंबानी यांना काही प्रमाणात मदत झाली, असे सांगितले जाते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला