आंध्र प्रदेश : वायएसआर काँग्रेसची सरकार स्थापण्याच्या दिशेने वाटचाल

- दिल्लीत 'किंग मेकर' बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नायडूंच्या हातातून राज्यही निसटणार

Chandrababu-Naidu_Jaganmohan-Reddy

अमरावती (आंध्र प्रदेश) : तेलगू देसम पार्टीचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना निवडणुकीच्या निकालाने जोरदार दणका दिला आहे. लोकसभेच्या मतमोजणीत फक्त एक  तर विधानसभेच्या १७५ जागांपैकी फक्त २५ जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती राहील ही अपेक्षा बाळगून, नवे सरकार गठित  करण्यात आपली महत्त्वाची भूमिका असावी या दृष्टीने गेल्या १०-१५ दिवसांपासून धावपळ करत असलेले चंद्राबाबू नायडू यांना आता केंद्रात  सरकार स्थापन करण्यात कोणतीही भूमिका राहणार नाही.  सरकार स्थापन करण्यात त्यांचा संबंध राहणार नाही.

लोकसभेबरोबर आज आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यात नवी राजकीय शक्ती म्हणून वायएसआर काँग्रेस (१४२ जागांवर आघाडी घेत) पुढे आली आहे.

जनसेनेकडून निवडणूक लढवीत असलेले अभिनेते पवन कल्याण यांनी आघाडी घेतली आहे. वायएसआर काँग्रेसने बहुतांश जागांवर आघाडी घेतली असून तिथे टीडीपी खूप मागे आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीतही वायएसआर काँग्रेसने तब्बल २४ जागांवर आघाडी घेतली आहे. टीडीपी केवळ एका  जागेवर आघाडीवर आहे. राज्यात विधानसभेच्या १७५ जागांसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी सुरू आहे.

देशभरातील लोकसभा मतदार संघातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा : http://bit.ly/LoksabhaResults2019