आंध्र बँकेच्या तोट्यात १० टक्क्यांहून अधिक वाढ

५७९ कोटी रुपयांवर गेला तोटा

Andhra Bank

मुंबई : सरकारी बँकांना बुडित कर्जे व तोट्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी नानाविध उपाय योजना केल्या जात असल्याचा दावा केंद्र सरकार करीत आहे. तसे असले तरी आंध्र बँक या सरकारी बँकेचा तोटा मात्र वाढला आहे. बँकेच्या तोट्यात मागील तिमाहीपेक्षा १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

आंध्र बँकेने सोमवारी चालू आर्थिक वर्षातील ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीचे निकाल घोषित केले. पण त्यामध्ये बँकेचा तोटा ५७८.५९ कोटी रुपयांवर गेल्याचे समोर आले. मागील आर्थिक वर्षात हाच तोटा ५३२.०२ कोटी रुपये होता.

केंद्र सरकारच्या प्रयत्नातून बँकेच्या मिळकतीत मात्र तिमाहीत ५३२२.३३ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत बँकेला ५०९३.४३ कोटी रुपयांची मिळकत झाली होती.

बुडित कर्जे व त्यापोटी करावी लागणारी तरतूद, ही आज सरकारी बँकांची सर्वात मोठी समस्या आहे. आंध्र बँकेलासुद्धा याच तरतुदीसाठी १७९०.१७ कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. मागील आर्थिक वर्षात याच काळात ही तरतूद १७४४.९९ कोटी रुपये होती.