…आणि अशा तऱ्हेने शरद पवार यांनी ‘ठाकरे’ सरकार पाडण्याचा डाव हाणून पाडला

Sharad pawar-Uddhav Thackeray

मुंबई : काही आयपीएस अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांचा तो डाव हाणून पाडला, असा खळबळजनक दावा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे. यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नाही, असे म्हणत त्या अधिकाऱ्यांविषयी नाराजीही व्यक्त केली. लोकमत ऑनलाईनच्या ‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी यावर भाष्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अति वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे; तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad pawar) यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले.

शरद पवार यांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेऊन त्यांना तातडीने पदावरून बाजूला करा, त्यांच्याकडे दुसरे काम द्या, असे सांगत अन्य चार अधिकाऱ्यांची नावेही सांगितली होती, असेही एका नेत्याने स्पष्ट केले. पवारांनी ही माहिती देताच सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच हाणून पाडला गेला. नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्यातील काही अधिकाऱ्यांना बाजूला सारले गेले. तर काही अधिकाऱ्यांना आजही महत्त्वाची पदे दिली आहेत. वास्तविक अशा अधिकाऱ्यांना पूर्णपणे बाजूला ठेवायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : काही आयपीएस अधिकाऱ्यांनी ‘ठाकरे’ सरकार पडण्याचा प्रयत्न केला, गृहमंत्री देशमुखांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER