…अन्‌ राष्ट्रवादीचे नशीब उजाडले !

NCP Flags

पुणे : नुकताच संपन्न झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर आता सरपंचपदासाठी सर्वच पक्षांची धडपड सुरू आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाचा सरपंच व्हावा यासाठी पक्षातर्फे मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र इंदापूर तालुक्‍यातील कळंब ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नशीब अचानक उजाडले. या ठिकाणी भाजपपुरस्कृत (BJP) सदस्याचे मत बाद झाले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नशीब उजाडले. कारण, सरपंचपदाच्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांना समान मते पडली. चिठ्ठीद्वारे झालेल्या सरपंचपदाच्या निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला लॉटरी लागली. राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पुरस्कृत पॅनेलच्या विद्या अतुल सावंत यांना सरपंच होण्याचा बहुमान मिळाला, तर उपसरपंचपदी भाजपचे लक्ष्मण जगन्नाथ पालवे यांचा एका मताने विजय झाला.

कळंब ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची झाली होती. यामध्ये भाजपपुरस्कृत पॅनेलला 9 व राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनेलला 8 जागा मिळाल्या होत्या. भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाने सरपंचपदावर दावा केला होता. ग्रामपंचायत सदस्य फोडाफोडीच्या राजकारणाला वेगही आला होता. सरपंचपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे विद्या अतुल सावंत व भाजपतर्फे अनिता नंदकुमार सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सरपंचपदासाठी चुरस असल्याने गुप्त मतदान घेण्याचे निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. पुजारी यांनी घेतला.

गुप्त मतदानासाठी मतपत्रिका तयार करुन सावंत व सोनवणे या दोन उमेदवारांची नावे टाकून कुठल्याही एका नावापुढे खुणा करण्याच्या सुचना ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात आल्या होत्या. यामध्ये 17 पैकी एका सदस्याने दोन्ही उमेदवारच्या नावापुढे खुणा केल्यामुळे एक मत बाद झाले. सावंत व सोनवणे या दोन्हींना प्रत्येकी आठ मते पडल्याने चिठ्ठीद्वारे सरपंचपदाचे नाव जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सावंत व सोनवणे या दोघांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्यानंतर गावातील पाच वर्षांच्या रुद्र चव्हाण याच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीच्या विद्या सावंत यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पुजारी यांनी सावंत यांना विजयी घोषीत केले. उपसरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे लक्ष्मण जगन्नाथ पालवे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र कल्याण डोंबाळे यांचा एका मताने पराभव केला. पालवे यांना 9 व डोंबाळे यांना 8 मते पडली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक पी. के. घोगरे यांनी काम पाहिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER