आणि स्वानंदीला आली बाबाची आठवण

Swanandi berde

स्टार किडबद्दल नेहमीच एक उत्सुकता असते. त्यात जर अशा मुलांचे आई किंवा वडील लोकप्रिय अभिनेता किंवा अभिनेत्री असतील तर त्यांची मुलेही याच क्षेत्रात येणार अशी प्रेक्षकांमध्येही एक अपेक्षा असते. एकेकाळचा सुपरस्टार अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे याचा मुलगा अभिनय याने मराठी सिनेमात दमदार पदार्पण केल्यानंतर आता लक्ष्याची लेक स्वानंदी हीदेखील रंगभूमीवर आगमन करत आहे. या नाटकाचं नाव आहे “धनंजय माने इथेच राहतात का?” या नाटकाची तालीम करत असताना स्वानंदीला पदोपदी बाबा लक्ष्मीकांतची आठवण येत होती. कारण धनंजय माने हे फक्त एका नाटकाचं नाव म्हणून समोर येणार नाही तर हे नाव असलेला अशी ही बनवाबनवी हा सिनेमा आनंदीचे वडिल लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यातला एक माईल स्टोन आहे. हे नाव स्वानंदीच्या घरात वसलेलं आहे. या नावाशी ती जोडली गेली आहे कारण तिचे वडील लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या सिनेमांमध्ये धनंजय माने या नावाने किमया केली आणि म्हणूनच या नाटकाची तालीम करत असताना अनेकदा स्वानंदीच्या डोळ्यात पाणी आलं होते. . हीआठवण स्वानंदीने एका मुलाखतीत शेअर केली आहे

धनंजय माने इथेच राहतात का?

आणि अरे परशुराम ये ये ये हा संवाद मराठी सिनेमावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर कोरला गेला आहे. अशी ही बनवाबनवी हा विनोदी पट बघून मराठी प्रेक्षकांची पारायणं झाली असतील. हा सिनेमा हिट झाला तितकेच या सिनेमातील धनंजय माने हे नाव देखील प्रचंड लोकप्रिय झालं. धनंजय माने ही भूमिका अभिनेते अशोक सराफ यांनी वठवली होती तर याच सिनेमात परशुराम नावाची व्यक्तिरेखा साकारली होती ती लक्ष्मीकांत बेर्डे याने. लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी ही “धनंजय माने इथेच राहतात का?” या लवकरच रंगभूमीवर येणाऱ्या नाटकात काम करणार आहे. तिचे हे पहिलेच नाटक आहे किंबहुना अभिनयक्षेत्रात पाऊल टाकत असताना तिला जे नाटक मिळालं त्या नाटकाच्या शीर्षकात धनंजय माने या नावाचा उल्लेख असणे हा माझ्या अभिनय कारकिर्दीला बाबाचा असलेला आशीर्वाद आहे असं स्वानंदीला वाटतं.

स्वानंदी आणि तिचा भाऊ अभिनय हे खूप लहान असताना लक्ष्मीकांत बेर्डे काळाच्या पडद्याआड गेला. त्यानंतर प्रिया बेर्डे हिने दोन्ही मुलांचा सांभाळ करत तिची अभिनय कारकीर्द देखील सुरू ठेवली. या सगळ्याची जाणीव स्वानंदी आणि तिचा भाऊ अभिनय या दोघांनाही आहे. लक्ष्याचा मुलगा अभिनय याने “सध्या ती काय करते” या सिनेमातून रुपेरी विश्वात पदार्पण केलं तेव्हाच लक्ष्याची मुलगी स्वानंदीदेखील याच क्षेत्रातील येणार का ? याची चर्चा सुरू झाली होती. आता धनंजय माने इथेच राहतात का या नाटकातून स्वानंदी बेर्डे ही रंगभूमीवर आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असल्याची बातमी जाहीर झाल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्वानंदी याबद्दल सांगते की, आई वडील अभिनय क्षेत्रात असल्यामुळे अनेकदा मला आणि अभिनयला असं विचारलं जायचं की आम्ही पण याच क्षेत्रामध्ये करिअर करणार आहोत का ? पण खरं सांगायचं तर आईने आम्हाला कधीच जबरदस्ती केली नाही. माझा भाऊ अभिनयाला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं. पण मी कधी सिनेमात, नाटकात, अभिनय करू शकेन याचा मी कधीच विचार केला नव्हता. मला भीती वाटायची की मला अभिनय जमणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे वडील सुपरस्टार होते. आई लोकप्रिय अभिनेत्री आणि डान्सर आहे. त्यामुळे जर आपल्याला अभिनय जमला नाही तर त्यामुळे कुठेतरी त्या दोघांना दोष दिला जाईल असं मला सतत वाटायचं. पण जेव्हा या नाटकात काम करणार का असं मला विचारण्यात आलं तेव्हाही मी विचार करण्यासाठी थोडा वेळ मागून घेतला.

थोडीफार रिहर्सल केली आणि त्यानंतर मला असं वाटायला लागलं की मला हे नक्कीच जमू शकेल आणि मग मी तालीम करायला सुरुवात केली. अशी ही बनवाबनवी हा सिनेमा आमच्या घरातही आम्ही खूप पाहतो आणि धनंजय माने ही व्यक्तिरेखा किती लोकप्रिय आहे हे मला माहित आहे. त्यामुळे आम्ही लहानपणापासून धनंजय माने हे नाव ऐकले आहे. ही कुणी तरी आपल्याच घरातील व्यक्ती आहे असं मला नेहमी वाटतं आणि या नावाशी माझ्या बाबाचा एक वेगळा संबंध आहे. जेव्हा या नाटकाची तालीम सुरू झाली आणि धनंजय माने हे नाव या निमित्ताने माझ्या तोंडात यायला लागलं तेव्हा मी खूप भावूक झाले. या नाटकांमध्ये धनंजय माने यांच्या पत्नीची भूमिका करत असल्यामुळे तो एक वेगळा धागा जोडला गेला आणि तेव्हा मला बाबाची खूप आठवण आली.

धनंजय माने म्हटलं की मला अशी ही बनवाबनवी सिनेमातील अनेक सीन डोळ्यासमोर यायला लागले ज्या मध्ये माझा बाबा आहे. हे नाटक जरी व्यावसायिकदृष्ट्या माझी सुरुवात असली तरी माझ्या आयुष्यामध्ये या नाटकाची तालीम आणि त्या निमित्ताने सतत बाबा माझ्याबरोबर असल्यासारखी जाणीव होत होती. मी या नाटकाचे प्रयोग करेनच पण या नाटकाच्या तालमी मला कायम लक्षात राहतील कारण ही तालीम करत असताना धनंजय माने या नावासोबत सतत मला बाबा सोबत असल्यासारखा वाटत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swanandi L Berde (@swanandiberde)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER