आणि मंदार बचावला

Mandar Jadhav

सेटवर घडणाऱ्या गमतीजमती आपण ऐकत असतो. शूटिंग सुरू असताना कलाकारांना अपघातही होत असतात. त्यासंदर्भातले किस्से, प्रसंग कलाकार त्यांच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील जयदीप शिर्के पाटील ची भूमिका करणाऱ्या मंदार जाधव (Mandar Jadhav) यांच्या बाबतीतही असाच प्रसंग घडला. मालिकेतील शालिनी ची भूमिका करणाऱ्या माधवी निमकर च्या पदराला अचानक सेटवर आग लागली आणि तिला वाचवताना मंदारही थोडक्यात बचावला.

सध्या ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे. जयदीप ची बालमैत्रीण गौरीशी एका विचित्र परिस्थितीमध्ये त्याची प्रेयसी ज्योतिका हिला डावलून गौरीशी लग्न करावे लागले. अर्थात त्याने मालिकेत हा निर्णय वडिलांच्या मर्जी खातर घेतला आहे, त्यामुळे गौरी आणि जयदीप यांचं नातंही एका वेगळ्या वळणावर आले आहे. सहाजिकच मालिका उत्सुकतेचा आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा विषय बनली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये शालिनी ही भूमिका करणारी माधवी नीमकर स्क्रीनवर ग्रे शेड मध्ये दिसत आहे. नुकताच या मालिकेत जयदीप आणि गौरीच लग्न झालं आहे. आणि लग्नानंतरचे काही विधी शिर्के पाटलांच्या घरात सुरू आहेत. मालिकेच्या सेटवरचे धमाल मस्ती आणि पडद्यामागचे किस्से सतत मंदार आणि सगळेच कलाकार शेअर करत असतात, पण दोन दिवसापूर्वी मंदारच्या सोशल मीडिया पेजवर वाचता वाचता वाचलो अशी कॅप्शन लिहिलेला व्हिडिओ शेअर झालाय.

त्याचं झालं असं की मालिकेमध्ये लग्नानंतरची पूजा सुरू असताना शालिनी म्हणजेच माधवी निमकर तिच्या पदराला आरतीतील निरंजन लागल्यामुळे तिच्या पदराने काहीसा पेट घेतला. हे सेटवर असलेल्या मंदार जाधवचा लक्षात आलं आणि तो तिला वाचवण्यासाठी पुढे आला. आणि अचानक त्याचा पाय त्या आरतीतील निरंजनावर पडला. त्यामुळे एकीकडे माधवी ला वाचवण्यासाठी धडपड आणि दुसरीकडे त्याचा पाय भाजल्या मुळे उडालेला गोंधळ असा प्रसंग मालिकेच्या सेटवर घडून आला. सुरूवातीला सगळेच कलाकार या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे बावरून गेले, मात्र मंदारनेही प्रसंगावधान राखत स्वतःला सावरले. यानंतर बोलताना मंदार जाधव म्हणाला की , यापूर्वीदेखील दत्तगुरु या मालिकेमध्ये असेच किरकोळ आणि छोटे-छोटे अपघात सेटवर झाले होते मात्र यावेळी माधवी निमकर च्या साडीला निरांजनातील पेटी वात लागल्यामुळे मला त्या वेळेला स्वतः पेक्षा जास्त महत्त्वाचं वाटलं माधवी निमकर ला वाचवने. माधवीने मंदारचे खूप आभार मानले असून खरं तर त्या वेळी मालिकेच्या सेटवर खूप सारे कलाकार होते मात्र प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता.

मंदार चे अचानक लक्ष गेलं आणि त्याने मला वाचवले.ही गोष्ट मला कायम स्मरणात राहील .आम्ही शॉट नसतो तेव्हा खूप मजा मस्ती करत असतो. आता तर आमचं शिर्के पाटलांचा पडद्यावरचं कुटुंब हे एका फॅमिली सारखं बनले आहे. अशा घटना घडतात आणि त्यामध्ये आपण एकमेकांसोबत किती आहोत याची प्रचिती देणारे असे क्षण येत असतात. आणि हादेखील त्यातलाच एक क्षण आहे. मंदारने समयसूचकता दाखवल्यामुळे आज एक अनर्थ टळला. मंदार जाधव ,गौरी ची भूमिका करत असलेली गिरीजा प्रभू तसेच माधवी निमकर ,वर्षा उसगावकर यांची मालिकेचे निमित्त चांगलीच गट्टी जमली आहे. माधवी निमकर देखील अनेक डान्स वर छोटे-छोटे व्हिडिओ सतत शेअर करत असते, मात्र आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या व्हिडिओ शेअरिंग मध्ये मंदारने शेअर केलेला हा वेगळा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांनी देखील मंदारला कौतुकाची थाप दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER