अन् म्हणे” समज आली !”

And he said I understand

मध्यंतरी अवकाळी पाऊस सुरू होता तेव्हाचा प्रसंग . पाऊस जोमदार सुरू होता आणि समोरच्या बंगल्यातील नीलू ताई शाळेतून मुले आली नाही म्हणून वाट बघत होत्या. अस्वस्थपणे येरझारा मारणे सुरू होते त्यांचे . म्हणून मी पण आमच्या खिडकीतून लक्ष ठेवून होते. थोडी काळजी वाटत होती. थोड्या वेळाने मुले आली. काळजी मिटली असं म्हणून मी सुद्धा हसून हात हलवला आणि घरात आले. दुसर्‍या दिवशी त्या भेटल्या तेव्हा सांगत होत्या, काल मुलं घरी आली तेव्हा मेघना फणकाऱ्यात आली तर छोटा आदित्य कसं बसं दप्तर सांभाळत आला आणि ताई का रागवते हे त्याला न कळल्यामुळे भांबावलेला होता. मेघना रागाने सांगत होती, “हां ! त्याच्यामुळे लागला यायला उशीर. हा येणाऱ्या-जाणाऱ्या रिक्षा मागे धावत होता”. निलू ताईनी जेव्हा आदित्यला विचारलं,तेव्हा तो म्हणाला की ,”अग आई, एका आजोबांना खूप लांब जायचं होतं .ते खूप प्रयत्न करत होते पण त्यांना एकही रिक्षा थांबत नव्हती ,मला वाईट वाटलं !पाऊस पण खूप होता. मग मी रिक्षा दिसली की धावत तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो आणि विचारत होतो पण कोणी थांबतच नव्हतं.

भर पावसात रिक्षा थांबवण्यासाठी धावणारा आदित्य त्यांच्या डोळ्यासमोर आला आणि क्षणभर भीती वाटली, रागही आला. पण एवढ्या छोट्या मुलाला दुसऱ्यांसाठी ,अडीअडचणीत अडकलेल्या आजोबांसाठी काही करावसं वाटलं यामुळे त्यांना मुलाचा अभिमानही वाटला.

हे जेव्हा मला सांगितलं तेव्हा मलाही खूप आनंद झाला. म्हणूनच मला लहान मुलांमध्ये मिसळून जायला खूप आवडतं .मन असंच असतं त्यांचं, निरागस ,सहज, प्रेमळ, निष्कपट ! कुठल्याही गोष्टींमधले बाकी फरक त्यांच्या खिजगणतीत नसतात, केवळ समान धागा असतो तो फक्त निरागसतेचा. मात्र जसजसं मुलं मोठी होतात, अशावेळी त्या वागण्यामध्ये बदल होत जातो. आणि आपण उलट त्याला म्हणू लागतो की ,त्याला किंवा तिला आता “समज आली.”हा विरोधाभास मला नेहमीच जाणवतो.

खरी मॅच्युरिटी, प्रगल्भता, परिपक्वता ,मोठे होणे, आणि व्यवहारचातुर्य किंवा या अशा प्रकारची समज येणे . खूप फरक आहे याच्या मध्ये. ज्याला आपण परिपक्वता म्हणू शकतो ,त्यात काय बरोबर ,काय चूक हे नीट कळत ,सारासार विचार करता येतो आणि समतोल साधता येतो असं मी मानते. त्यामुळे वागण्यात एक स्थिरता येते.

मोठे होणे ही खूप वेगळी संकल्पना आहे. तिचे अर्थ व्यक्तीप्रमाणे बदलतात. सगळी मोठी माणसं मुलांना आशीर्वाद देताना,” खूप मोठा हो!” असा देतात. श्यामची आई श्यामला म्हणत असे, किंवा तोत्तोचान शिक्षक कोबायाशी मुलांना म्हणायचे,” मोठे व्हा!”खरे तर निसर्ग क्रमानुसार शरीराने आणि वयाने मोठे होण्यापलीकडे मोठे होणे म्हणजे काय ? तर ही ज्याची त्याची स्वतःची अतिशय ‘ युनिक’ अशी प्रक्रिया आहे. क्षमतांचा विकास यात अपेक्षित असतो, व्यक्तिमत्व विकास अपेक्षित असतो.

व्यवहारचातुर्य याबाबत मात्र थोडा स्वार्थीपणाचा क्वचित गंध येतो, माझ्यासाठी नेमकं काय योग्य ते चतुरपणाने मी कस मिळवू शकेल ? काहीही करून ! मग यात समोरच्या व्यक्ती परिस्थितीचा फार काही विचार करण्याची गरज लागत नाही. याचा विरुद्धार्थी शब्द , भोळसर असा साधारण केल्या जातो. म्हणून व्यवहारचातुर्य संकल्पना नीट चाचपुन घ्यायला पाहिजे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर एखाद्या आलिशान गाडीमध्ये एखादा गोंडस मुल असतं .गाडीच्या काचे वर भीक मागणारी टकटक करते, तिच्याही हातात तसंच एक बाळ असतं. आणि मग ती दोघंही एकमेकांकडे बघून मस्त हसतात. कारण सवंगडी वाटतात ते एकमेकांना . त्यांच्या ठिकाणी आर्थिक-सामाजिक भेदाचा स्पर्शही नसतो. केवळ एकच सारखेपणा असतो तो म्हणजे निष्पाप, निरागस ,निकोप मन !

पण मोठी माणसं ?…… असं नाही करत. कारण त्यांना “समज आली” असते. हे समज येणं मला नेहमीच खटकते .म्हणूनच एखादे बाबा मुलाला बाहेर आलेल्या गृहस्थांना घरी नाही किंवा गावी गेलो म्हणून सांग असे सांगतात. मुलं मात्र तसं सांगताना गडबडू शकतं. असं का ? त्यांच्या बाबांना समज आलेली असते म्हणे ! खूप कष्ट करून स्वतःचे कौशल्य लावून आणि अाहार दृष्ट्या समतोल असणारा टिफिन आई मुलाला देते. मुलगा शाळेत तो डबा मित्राने मागितला, त्याला आवडला तर त्याला देऊन देतो, आणि त्याच्या डब्यातली शिळ्या पोळ्यांची फोडणीची पोळी किंवा ब्रेड आवडीने खाऊन घेतो.

कारण त्याला समज आलेली नसते !
परंतु घरी आल्यावर काहीतरी खात असताना जर मित्र आले तर मात्र आई घाईघाईने दार उघडून सांगते ,”तो अभ्यास करतोय थोड्यावेळाने येईल खेळायला ,” आणि मुलाला घरात येऊन सांगते. “सावकाश खा रे !” कधीतरी त्यांच्याही हातावर त्यातला खाऊ द्यावा असं वाटत नाही. कारण तिला समज आलेली असते.

फ्रेंड्स ! मला नेहमीच असं वाटतं वाढत्या वयाप्रमाणे व्यक्तिमत्व बहरणं, परिपक्वता ,मनाचा समतोल आवश्यकच आहे .पण ही सगळी विशेषणे जर ,”अशा समज येण्याला” लागत असतील तर ते मात्र योग्य नाही ! हा निरपेक्षपणा, निरागसपणा मोठे होण्यातला अडसर बनणार नाहीत जर खरच मोठे होण्याचा प्रवास आपण नीट समजावून घेतला तर, मोठे होण्याचे कोडे उलगडेल आणि खरा खरा “समज येण्याचा” अर्थही कळेल .

स्मृती, प्रतिभा, शारीरिक कौशल्य, याबरोबर तर मन, भावना ,व्यक्तिपरत्वे स्वभावाला प्रेरणा ,प्रयत्न चिकाटीची जोड मिळून ,त्याला योग्य असे शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळाले- संधी मिळाल्या की त्यातून व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. याला पालक, शिक्षक ,मित्र म्हणजेच शाळा, कुटुंब आणि समाज, भौगोलिक प्रदेश, तिथली संस्कृती ,आर्थिक स्थिती हेदेखील हातभार लावतात. आणि मग आपोआपच ही “मोठे होण्याची प्रक्रिया “समजून घेताना वर उल्लेखलेल्या” समज येण्याला” कसं स्थान नाही हेच लक्षात येते.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button