… आणि चंद्रकांतदादांनी गाठले शिवसेना कार्यालय

Chandrakant Patil

सांगली : पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुढाकार घेतला आहे. प्रचारासाठी सांगलीत आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी चक्क इस्लामपूर शिवसेना कार्यालयाला भेट देऊन जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात  चर्चा रंगली.

चंद्रकांत पाटील य‍ांनी शिवसेना कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी शिवसेनेचे आणि भाजपचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन विरोधी पक्षांतील नेते एकमेकांना भेटले. यानंतर बंद खोलीत या दोघांच्या चर्चा झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांना पुणे पदवीधरमधून उमेदवारी दिली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पदवीधरचे ८४ हजार १९१ मतदार आहेत.

त्यामुळे भाजपने सांगली जिल्ह्यातून राष्ट्रवादी विरोधकांची मोट बांधण्यासाठी कंबर कसली आहे. इस्लामपुरात स्थानिक पातळीवर शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार हे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात. आनंदराव पवार इस्लापूर नगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक आहेत. राज्यात राष्ट्रवादी -शिवसेना सत्तेत असल्यामुळे सांगली जिल्ह्यातसुद्धा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक एकत्र आले आहेत. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या कार्यालयात भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER