
गेले अनेक दशके फिल्मफेअर (Filmfare) हिंदी चित्रपटांना पुरस्कार देत आला आहे. त्यानंतर त्यांनी प्रादेशिक भाषेतील सिनेमांनाही त्यांनी पुरस्कार देण्यास सुरुवात केली. चार वर्षांपूर्वी त्यांनी मराठी सिनेमांनाही पुरस्कार देण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या सावटातून इंडस्ट्रीतून बाहेर पडत असतानाच यंदाही पाचव्या फिल्मफेअर मराठी पुरस्काराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी (Dr. Anandi Gopal Joshi) यांच्या जीवनावर आधारित सिनेमाने बाजी मारत चक्क 11 पुरस्कारांवर कब्जा केला.
यावेळी आनंदी गोपाळ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (समीर विद्वांस –आनंदी गोपाळ) आणि मुक्ता बर्वेला ‘आनंदी गोपाळ’मधील भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आनंदी गोपाळने एकून 11 पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. ‘बाबा’ सिनेमातील भूमिकेसाठी दीपक डोबरियालला सर्वोत्तम अभिनेत्याचा तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रख्यात निर्माते दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे यांना एक्सलन्स इन सिनेमा पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
मुंबईतील सेंट अँड्यू ऑडिटोरियममध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रेड कार्पेटवर मराठी सिने जगतातील मानसी नाईक, क्रांती रेडकर-वानखेडे, पूजा सावंत, सई देवधर, अमृता खानविलकर, अमृता सुभाष, श्वेता शिंदे, मंजिरी ओक, रुपाली भोसले, वर्षा उसगावकर, मुक्ता बर्वे, आदिती सारंगधर, सोनाली कुलकर्णी, मैथिली पालकर, किशोरी शहाणे-विज, मृणाल कुलकर्णी, नीना कुलकर्णी, निशीगंधा वाड या नायिकांसह शरद केळकर, वैभव तत्ववादी, गष्मीर महाजनी, प्रसाद ओक, पुष्कर जोग, शुभांकर तावडे, सचिन पिळगावकर, सुबोध भावे असे नायकही उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी होती बॉलिवुडमधील प्रख्यात अभिनेत्री परिणीती चोप्रा.
पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अमेय वाघ, सिध्दार्थ जाधव आणि मोनिका मुर्ती यांनी केले. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील वैभव तत्ववादी, मानसी नाईक, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत आणि गश्मीर महाजनी यांनी परफॉर्मन्स सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
अन्य विजेेते पुढीलप्रमाणे-
सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): शशांक शेंडे (कागर), सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (स्त्री): नीना कुलकर्णी (मोगरा फुलला), सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम- सौरभ भालेराव, हृषिकेश दातार आणि जसराज जोशी (आनंदी गोपाळ),
सर्वोत्कृष्ट गीत- क्षितिज पटवर्धन- तुला जपणार आहे (खारी बिस्किट), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): आदर्श शिंदे – तुला जपणार आहे (खारी बिस्किट), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (महिला): शाल्मली खोलगडे -रीडा क्वेरिडा (मैत्रीण), सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री): शिवानी सुर्वे (ट्रिपल सीट), सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष)- शुभांकर तावडे (कागर), सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक- सलील कुलकर्णी (वेडिंगचा शिनेमा), सर्वोत्कृष्ट बाल कलाकार- आदर्श करम आणि वेदश्री खाडिलकर (खारी बिस्किट), सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी समीक्षकांचा पुरस्कार- राज आर गुप्ता (बाबा), समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनय पुरस्कार (पुरुष)- ललित प्रभाकर (आनंदी गोपाल), समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेय पुरस्कार- (स्त्री) सोनाली कुलकर्णी (हिरकणी) आणि भाग्यश्री मिलिंद (आनंदी गोपाळ).
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला