डॉ.आनंद तेलतुंबडे यांनी भावाला माओवादी बंडखोरीची स्फूर्ती दिली

NIA - Anand Teltumbde
  • जामीन अर्जाला विरोध करताना ‘एनआयए’चा दावा

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार (Bhima Koregaon Violence) आणि एल्गार परिषद (Elgar Parishad) खटल्यात अटक केलेले एक आरोपी आणि ‘आयआयटी’चे माजी प्राध्यापक डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी त्यांच्या मिलिंद या भावाला प्रतिबंधित माओवादी संघटनेत सामिल होण्याची स्फूर्ती दिली आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मांडलेले आपले बंडखोर विचारांचे साहित्य त्या संघटनेचा प्रचार करण्यासाठी भावाला पुरविले, असा दावा राष्ट्रीय तपासी यंत्रणेने (NIA) केला आहे.

अटकेसाठी सरकारने ५० लाख रुपयांचे इनाम लावलेले मिलिंद तेलतुंबडे हे बंदी घातलेल्या ‘सीपीआय’ (माओवादी) या बंडखोर संघटनेचे महाराष्ट्र-मध्य प्रदेश छत्तीसगढ प्रभागाचे सचिव असल्याचे सांगितले जाते. हे दोन्ही भाऊ वरकरणी पूर्णपणे वेगळे आणि स्वतंत्र आयुष्य जगत असल्याचे भासवत असले तरी माओवादी बंडखोर विचार हा दोघांमधील दुवा आहे, असाही ‘एनआयए’चा आरोप आहे. डॉ. तेलतुंबडे यांनी पुरविलेल्या साहित्याचा  मिलिंद शहरी भागात माओवादी संघटनेच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी वापर करतात, असेही ‘एनआयए’चे म्हणणे आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार गेल्या १४ एप्रिल रोजी स्वत:हून ‘एनआयए’च्या स्वाधीन झाल्यापासून ‘गोवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये प्राध्यापक असलेले डॉ. तेलतुंबडे तुरुंगात आहेत. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात ‘एनआयए’ने एकूण आठ आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर डॉ. तेलतुंबडे यांनी प्रथमच जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याला विरोध करण्यासाठी दाखल केलेल्या उत्तरात ‘एनआयएएॅने डॉ. तेलतुंबडे यांच्यावर वरील आरोप केले आहे. डॉ. तेलतुंबडे हे ‘सीपीआय (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेचे सक्रिय सदस्य  आहेत व त्या संघटनेचा ‘अ‍ॅजेंडा’ राबविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात, असा त्यांच्यावरील खटल्यातील आरोप आहे. डॉ. तेलतुंबडे यांनी या ओरापांचे खंडन केले असून गेल्या १५ वर्षांत आपण आपल्या भावाला भेटलोही नाही, असे म्हटले आहे.

डॉ. तेलतुंबडे जामीन अर्जात म्हणतात की, ‘एनआयए’ने आपल्यावर हे आरोप करण्यासाठी ज्या दोन संरक्षित साक्षीदारांच्या जबानीचा आधार घेतला आहे ती जबानी अभियोग पक्षाने आपल्या कथनाला दुजोरा मिळविण्यासाठी त्यांच्याकडून वदवून घेतली आहे, हे अगदी उघड आहे. डॉ. तेलतुंबडे म्हणतात की, मी स्वत: माओवादी विचारांचा कट्टर टीकाकार आहे. ‘एनआयए’ ज्या दोन साक्षीदारांचा दाखला देते त्यांना मी कधी पाहिलेले नाही किंवा आमची कधी भेटही झालेली नाही. त्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल काही सांगितलेच असेल तर ते निव्वळ ऐकिव माहितीवर आधारित आहे.

याच खटल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कथित कट रचला जाणे हाही एक पैलू आहे. आरोपींकडून हस्तगत झालेल्या १० दस्तावेजांवरून या कथित कटाचा पर्दाफास झाला, असे ‘एनआयए’चे म्हणणे आहे. त्यातील एक दस्तावेज आरोपी रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमधून हस्तगत केलेले ‘प्रकाश’ नावाच्या व्यक्तिने ‘आनंद’ नावाच्या व्यक्तीस लिहिलेले एक पत्र आहे. ‘एनआयए’च्या म्हणण्यानुसार डॉ. तेलतुंबडे यांनी एप्लि २०१८ मध्ये पॅरिस येथे मानवी हक्क परिषदेत घेतलेला सहभाग व देशातील असंतोषास चालना देण्यासाठी त्यांनी दलितांच्या प्रश्नांवर केलेल्या भाषणांचा उल्लेख त्या पत्रात आहे. त्या काळात देशात व्यक्त झालेला दलितांचा असंतोष फक्त भीमा-कोरेगाव हिंसाचार हाच होता, असा संबंध ‘एनआयए’ने लावला आहे.

त्या कथित पत्राच्या संदर्भात डॉ. तेलतुंबडे जामीन अर्जात म्हणतात की, ते पत्र रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये सापडल्याचे ‘एनआयए’ म्हणत असली तरी वास्तवात ते पत्र आपल्याला मिळाले किंवा त्यावर मी काही कृती केली याला दुजोरा देणारा ‘एनआयए’च्या म्हणण्याखेरीज अन्य कोणताही आधार नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER