आनंद परांजपे निवडणुक खर्चात आघाडीवर

ठाणे (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्वत्र प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. त्यात या प्रचार सभा, रॉली, वाहनांवर तसेच इतर बाबींवर होणार्‍या खर्चाचा तपशिल दररोज देणे बंधनकारक आहे. त्यानुसार ठाणे लोकसभा क्षेत्रातील शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारंनी आपल्या खर्चाचा तपशिल दिला असून त्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने खर्चात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीवर होणारा खर्च हा चर्चेचा विषय झाला असून, दर पाच वर्षांनी त्यात मोठी वाढ होत आहे. हा खर्च मर्यादित रहावा आणि पैशाचा महापूर वाहू नये यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभेच्या उमेदवारांसाठी प्रचारखर्चाची ठरावीक रक्कम ठरवून दिली आहे. लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांना 70 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा निवडणूक विभागाकडून देण्यात आली. यामध्ये उमेदवरांकडून प्रचारासाठी येणार्‍या कार्यकत्यांच्या चहापाणी, नाष्टा, प्रचार सभा, रॉली, वाहन खर्च, टोपी, झेंडे, बिल्ले आदींवर प्रतिदिन होणार्‍या खर्चाचा तपशिल निवडणूक विभागाला देणे बंधनकारक असणार आहे.

ही बातमी पण वाचा : पंकजा मुंडेंना धक्का, …आणखी एक भाऊ राष्ट्रवादीत!

त्यानुसार ठाणे लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी 8 एप्रिल पासून 13 एप्रिल पर्यंत प्रचारासह, कार्यकर्त्यांच्या चहापाणावर, वाहन खर्चापोटी 3 लाख 36 हजार 393 रुपयांचा खर्च केला असल्याची माहिती निवडणूक विभागाला दिली आहे. त्यात 2014 साली विचारे यांनी 52 लाख 54 हजार 561 रुपयांचा खर्च केला असल्याची माहिती निवडणुक विभागाने दिली.

त्यात, राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनीही 8 एप्रिल पासून 13 एप्रिल या पाच दिवसात प्रचारासह, कार्यकर्त्यांच्या चहापाणावर, वाहन खर्चापोटी रॉलींवर 5 लाख 74 हजार 890 रुपयांचा खर्च केला असल्याची माहिती निवडणूक विभागाला दिली आहे. त्यात सन 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रसच्यावतीने संजीव नाईक निवडणूकीच्या रिंगणात होते.