एक अपूर्व अनुभूती -” एम्पथी अर्थात तदनुभूती” !

Empathy - Maharashtra Today

सहानुभूती व समानुभूती यातील अंतर फक्त’ ह ‘ व’ म ‘ चे आहे. मात्र बाकी वर्णन आणि मात्रा सारख्याच आहेत. परंतु हेच अंतर मानवी भावभावना मधली मोठा फरक दर्शवते. सहानुभूती या शब्दाचा वापर आपण रोजच्या व्यवहारात बहुदा करीत असतो. पण समानुभूती किंवा तदअनुभूती या शब्दाशी आमची ओळख फारच कमी असते . याचा अर्थ होतो पूर्णतः जागरुक होऊन दुसऱ्यांच्या भावनेला व विचारांना समजणे. ही मानवाच्या मनाची एक उच्चतम शक्ती आहे. दुसर्‍याचे दुःख समजून, वेदना त्यांच्या स्तरावर जाऊन समजणे आणि आपुलकीने त्यांचे सांत्वन करणे, धीर देणे. ही अवस्था अशी आहे की जसे कुणाच्या बुटांमध्ये आपला पाय घालून तो बूट पायाला कसा चावतो, त्याला किती कष्ट देतो आहे हे समजून घेणे. यामध्ये वेदना दुसऱ्याला होत असली तरी त्याच्या दुःखाने आमचा जीव तळमळत असतो. उदाहरणार्थ :- वाळवंटात पाण्याअभावी तडफडणाऱ्या गाढवाला बघितल्यानंतर ज्या प्रकारे एकनाथ महाराजांना दुःख झाले होते आणि त्यांनी आपल्या जवळचे पाणी त्याला नेऊन पाजले,हीच ती भावना.

संवेदनशीलता यात दोन भाव लपलेले असतात एक म्हणजे सम्यक वेदना, परिस्थितीचा योग्य बोध किंवा अनुभूती. आणि दुसरा भाव म्हणजे समान वेदना , म्हणजे दुसऱ्याची वेदना होते आहे तशीच वेदना स्वतःलासुद्धा होणे ,यात अनुभूती किंवा अनुभव जास्त सखोल आणि व्यापक होतो. ते दुःख बघून इतरांना काहीतरी करण्यासाठी प्रेरणा मिळते . ती त्यांच्यातल्या सेवेचा आणि सहानुभूतीचा भाग जिवंत करते, अशी सेवा करून माणसाच्या मनाला समाधान मिळते.

सहानुभूती आणि तदनुभूती या दोन शब्दातला फरक समजण्यासाठी असं बघा की जेव्हा आपण इतरांना सहानुभूती दाखवतो तेव्हा आपली स्थिती ही बाहेरील व्यक्तीची असते .दुरून त्या परिस्थितीकडे बघण्याचा प्रयत्न असतो आणि अंदाज घेणे असते. फक्त त्याआधारे परिस्थिती बाहेरील व्यक्ती त्या व्यक्तीच्या संबंधात आपले दुःख प्रकट करत असते. कुणाकडे काही दुर्घटना घडली तर आपण भेटायला जातो, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत असं म्हणतो. तसं बघितलं तर ही केवळ एक रीत आहे, समाजातली पद्धत आहे.

त्यापलीकडे जाऊन जेव्हा एखाद्याच्या घरामध्ये कोरोना पेशंट असतो, तेव्हा आपण त्याकडे जाऊ शकत नाही, खूप जवळची व्यक्ती असेल तर आपल्याला दुरूनच खूप वाईट वाटतं, काळजी लागते. पण आपण काही करू शकत नाही. या प्रकारच्या आजारात एवढेच शक्य आहे . पण इतर वेळा अशी हळहळ केवळ व्यक्त करणे म्हणजे सहानुभूती ! थोड्याशा कठोर भाषेत आपण त्याला “काडीने औषध लावणे “असे म्हणू शकतो.

(परंतु सध्याच्या कोरोना काळात तर अजूनही बरेच काही करता येण्यासारखे आहे ते म्हणजे दुरून होम quarantine असणाऱ्या लोकांशी त्यांना फार त्रास होत नसेल तर गप्पा करणे, त्यांना पॉझिटिव्ह दृष्टिकोन देणे, मेंटल आणि मॉरल सपोर्ट देणे,या सारख्या फार महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्या काळात करू शकतो, किंवा हवं-नको ते बघून टिफिन, आवडीचं खाण पिणं पुरवू शकतो. विषयाच्या ओघात आली म्हणून ही गोष्ट सांगितली.)

त्याविरुद्ध समानुभूती किंवा तदनुभूती यामध्ये एक मनुष्य कुणा दुसऱ्या मनुष्याच्या दुःखाला त्याच्याच दृष्टिकोनातून किंवा मनस्थितीतून समजून घेऊ शकतो. जणू काही तो स्वतःहाच त्या परिस्थितीतून जात आहे आहे, कष्ट भोगत आहे. त्याच्याच विचाराने, त्याचा विचार करतोय. त्याच्याच कानाने आपण ऐकतोय, त्याच्या डोळ्यांनी आपण बघतोय आणि त्याच्याच हृदयाच्या धडपडीतून आपण अनुभवतो आहे. याची फार सुंदर उदाहरणे आपल्या इतिहासात दिसतात, किंवा पुराण काळामध्ये दिसतात. धृतराष्ट् हे सुंदर जग बघू शकत नाही म्हणून गांधारीने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली होती. भरताने आपला हक्क नाही, हे समजून राम वनवासात गेल्यावर त्याच्या पादुका गादीवर ठेवून आपले कर्तव्य म्हणून राज्य चालवले पण कुठलाच सम्राट म्हणून आदर ,मान सन्मान त्यांनी स्वीकारला नाही. सीतामाईने सुद्धा राणी होण्याचा मान कधीच अनुभवला नाही, आणि लक्ष्मणाने आपल्या सगळ्या सुखउपभोगांवर पाणी सोडून रामाचा पाठीराखा म्हणून वनवास स्वीकारला.

आपण जेव्हा मोठे होतो आपल्याला जेव्हा मुले होतात,तेव्हा आपल्या आईवडिलांच्या मताशी आपण सहमत होतो, त्यांनी अमुक वेळा अशी प्रतिक्रिया का दिली असेल ? हे आम्हाला त्यावेळी कळत नाही .कारण आम्ही त्यांच्या ठिकाणी जाऊन विचार करू शकत नाही. हिंदीत एक म्हण आहे, “जा के पैर न फटी बिवाई, वो का जाने पीर पराई ” ज्याच्या स्वतःच्या पायाला कधी भेगा पडल्या नसतील, त्याला दुसऱ्याच्या पायाला पडणाऱ्या भेगांचा त्रास कळणारच नाही. आमच्या पायात पडलेल्या भेगांची वेदनाच आम्हाला दुसऱ्याच्या पायात पडलेल्या वेदनेची अनुभूती, अनुभव करून देतात आणि त्यामुळे आमची तदनुभूती (empthy) जागी होते. ज्यांच्या स्वतःची मुले दिव्यांग आहे असे पालक दिव्यांगांसाठी जास्त चांगले काम करू शकतात. अर्थात असं नसूनही त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे अनेक लोक असतात आणि त्यांची empathy लेव्हल अतिशय चांगली आहे अस आपण म्हणू शकतो.

समोरच्या व्यक्तीला कष्ट देणारी जी गोष्ट आहे त्यावर आम्ही जर सतत विचार केला, चिंतन-मनन केलं तरच आम्ही त्या दुःखी व्यक्तीचे दुःख दूर करू शकतो .भावनिक दृष्ट्या त्यांच्याशी रेपो डेव्हलप करू शकतो. empathy याचा अर्थ केवळ दुसऱ्यांच्या भावनेला आणि दु:खाला समजणे नाही तर ते कमी करण्यासाठी आम्ही आमच्याकडून काय करू शकतो ? हा विचार आणि त्याप्रमाणे कृती करणे. उदाहरणार्थ कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे आणि इतर संतांनी केलेले कार्य !

नीतिमत्ता व चारित्र्याचा विकास करण्याबरोबरच भावनिक बुद्धिमत्ता वाढवणे गरजेचे आहे असं आजकाल शिक्षण शास्त्रज्ञ म्हणताहेत. मुलांमधील चिडचिडेपणा आणि आक्रमक वृत्ती, भांडकुदळ वृत्ती कमी करण्यासाठी त्यांच्यात तदनुभूती वाढविणे ही अतिशय उपयोगाची गोष्ट आहे.

कार्पोरेट क्षेत्रात सुद्धा तेथील नामांकित आपल्या व्यापारात यशप्राप्तीसाठी हे गुण किती आवश्यक आहेत हे सांगत आहेत. इतर मानसशास्त्रज्ञ सांगतात की समानुभूती अर्थात एम्पथी हे जीवनातले खूप महत्त्वाचे एक तत्त्व आहे. जीवन संघर्षात लढून यशस्वी होण्यासाठी, आपला योग्य प्रभाव इतरांवर टाकण्यासाठी, मानवाला विध्वंस आणि हिंसेपासून रोखण्यासाठी याची गरज आहेच.

एखादा शारीरिक आजार झाला की लोकांना जेवढी सहानुभूती मिळते तेवढीच ऊपेक्षा आणि उपहास किंवा थट्टामस्करी ही मानसिक आजार झाला तर चहूबाजूंनी पदरात पडते. आपली माणसं देखील बरेच ठिकाणी परकी होतात. पूर्वीच्या तुलनेत आता भारतात देखील मनोरुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे आणि हा आजार देखील ग्लोबल होत चाललेला आहे. अशा रुग्णांपासून पिच्छा सोडवण्यासाठी त्यांचे नातलग , त्यांना रुग्णालयांमध्ये सोडून जातात .अक्षरश: डम्पिंग ग्राउंड सारखा त्याचा वापर करतात. आणि क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण भरती असल्यामुळे त्यांची स्थिती एखाद्या जेल सारखी होऊन जाते. या मानसिक रुग्णांना कुटुंब आणि समाजामध्ये संवेदनशील आणि तदनुभूतीपूर्ण वातावरण आवश्यक आहे.

Empathy ही भावना मुलांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमधून विकसित होत असते. मुलाच्या पहिल्या सहा वर्षांमध्ये ती भावनिक प्रतिसाद या स्वरूपात असते. अगदी वयाच्या पहिल्या वर्षातच जेव्हा मूल बाजूला रडत उभ्या असलेल्या मुलाकडे वळून बघायला लागतं, ते बघून बहुतेक वेळा स्वतःच रडू लागते. याला मनोविकारतज्ञ” ग्लोबल empathy”असं म्हणतात .कारण तेव्हा मुलाला स्वतः बाह्य जगतापासून वेगळे आहोत हे समजू शकत नाही आणि त्यामुळे दुसऱ्या मुलाच्या वेदना त्याला स्वतःच्याच वाटायला लागतात. दुसऱ्या वर्षात मात्र दुसऱ्यांच्या वेदना आपल्या नाहीत हे समजायला लागतं, पण त्यावेळी बोधात्मक शक्तीचा विकास झालेला नसतो. त्यामुळे दुसऱ्या मुलाचे दुःख कमी करण्यासाठी आपण नेमकं काय करावं हे कळत नाही.

वयाच्या दहाव्या वर्षानंतर मात्र जाणीवपूर्वक तदनुभूती हा टप्पा येतो. दुसऱ्याच्या बाजूने विचार करता येवू लागतो. दहाव्या वर्षानंतर ही भावना आणखीन वाढीस लागते.असं असलं तरीही काही मुलं भावनिकदृष्ट्या कोरडी ,दुसऱ्यांबद्दल जाणीव नसल्यासारखी पण वागतात. कारण त्याच्या बालपणीच्या काळातील घडामोडीशी याचे उत्तर निगडित असते. तेव्हा जर मुलांकडे दुर्लक्ष झालं तर ही कौशल्य विकसित होत नाहीत. मग मुलांमधील एम्पथी सुधारण्यासाठी, अल्बर्ट मेहेराबियन या मानसशास्त्रज्ञाने सांगितले की 58% संभाषण हे देहबोलीतून 35% आवाजातील सुरांमधून तर केवळ 7% शब्दातून व्यक्त होत असते म्हणून, शब्दाविनासंवाद करण्याचा प्रयोग करा.

1) उदाहरणार्थ एकच वाक्य भिन्न भावना असताना वेगवेगळ्या प्रकारे बोला.
2)टीव्ही म्युट करून त्या कार्यक्रमांमधील व्यक्तींच्या भावना काय आहेत हे मुलांना ओळखायला सांगा.
3) त्या कार्यक्रमातली व्यक्तिरेखेचा प्रश्न तुम्ही कसा सोडवाल हे त्यांना विचारा.
4) अवधान देऊन लक्षपूर्वक ऐकणे याचा खेळ खेळता येईल .यावेळी परस्परांना काही गोष्टी सांगायला सांगा आणि नंतर त्यांना एकमेकांच्या भावना आणि विचार काय आहेत ते विचारा.
5) एखादी काल्पनिक गोष्ट किंवा घडलेली गोष्ट मुलांना सांगायची आणि त्या प्रसंगातल्या अडचणीत किंवा त्या परिस्थितीमध्ये असलेल्या व्यक्तीचा दुःख दूर करण्यासाठी तू काय करशील ? हे मुलाला विचारायचं आणि तिला दिशा पण द्यायची.
6) याशिवाय विविध प्रकारच्या व्यक्तीं बरोबर संवाद साधणे, आपली वस्तू दुसऱ्याला देणे याला प्रोत्साहन देणे.

काही प्रश्नांवर आपण जर अनिवार्यपणे विचार केला : – जसे की कोणताही निर्णय करण्याआधी किंवा त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी याचा दुसऱ्यावर काय प्रभाव पडेल ? याचा नकारात्मक प्रभाव तर त्याच्यावर पडणार नाही ना? मी त्याच्या जागेवर असते/असतो, तर मला कसे वाटले असते ?

नेहमी स्वार्थाचाच विचार न करता आम्ही दुसऱ्यांच्या दुःखाला कशा प्रकारे कमी करू शकतो ?किंवा आम्ही असे काय करू शकतो की ज्यामुळे कुणाच्या आयुष्यात थोडी तरी खुशी, थोडा तरी आनंद किंवा हसू येऊ शकेल ? हा विचार जरी आम्ही दररोजच्या आयुष्यात केला तरी आमच्याकडून खूप काही कार्य नकळत घडेल.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button