राष्ट्रवादीचा विधानसभा अध्यक्षपद नव्हे तर मुख्यमंत्रीपदावर डोळा?

Nana Patole-Sharad Pawar

मुंबई :- पहिल्यापासून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता पटोले यांनी राजीनामा दिल्याने, लवकरच प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची लवकरच घोषणा होणार आहे. मात्र नाना पटोलेंचा राजीनामा किंवा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती ही केवळ काँग्रेस पक्षापुरती मर्यादित बाब राहिलेली नाही. या घडामोडीचा परिणाम महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) होत आहे. कारण नाना पटोले यांनी सोडलेलं विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्याबदल्यात काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे. या केवळ चर्चाच आहेत. मात्र सेना-काँग्रेसमध्ये जर खलबतं होत असली, तरी राष्ट्रवादीचा डोळा थेट मुख्यमंत्रीपदावर असल्याच सांगितलं जात आहे.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. “विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते खुलं झालं आहे. विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल”, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार, असे संकेत मिळत आहेत.

सत्तास्थापनेच्या किमान-सामान कार्यक्रमानुसार काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद गेलं. ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला तर उपमुख्यमंत्री, अर्थ, गृह ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला मिळाली. 2019 मधील विधानसभा निकालानुसार, भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा कमी होत्या. मात्र अपक्षांसह शिवसेनेने आपलं संख्याबळ 60 पर्यंत वाढवलं. तरीही महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडे सर्वाधिक 16 मंत्रिपदं आहेत. शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदासह 14 आणि काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षांसह 12 खाती आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता, कोण कोणत्या पदावर दावा सांगेल हे सांगणं कठीण आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरुन भाजपशी काडीमोड घेतल्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपद सोडेल या चर्चेत तथ्य नाहीच. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांची यापूर्वी विधानं पाहता, विधानसभा अध्यक्षपद तो बहाना, मुख्यमंत्रिपदावर निशाणा? अशी चर्चा आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER