भारत भवनच्या बांधकामात मजूरी काम करणाऱ्या भवरी देवींच्या चित्रांचं आज त्याच भवनामध्ये भरवलं जातं प्रदर्शन!

Maharashtra Today

मध्यप्रदेश जनजाती संग्राहलयात काम करणाऱ्या भिल्ल चित्रकार भुरिबाई बरिया (Painter Bhuribai Baria) हे कला आणि सांस्कृतीक जगतातलं मोठं नावं आहे. त्यांच्या चित्रांनी जगभरात स्वतःच्या नावाची ओळख निर्माण केलीये. मध्यप्रदेशच्या संग्राहलयांपासून ते अमेरिकेपर्यंत त्यांच्या नावाची चर्चा होते आहे. मध्यप्रदेश राज्याचा कला क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ मानला जाणारा ‘देवी आहिल्याबाई पुरस्कार’ (Devi Ahilyabai Award)आणि ‘राणी दुर्गामती पुरस्कार'(Rani Durgamati Award) त्यांनी मिळवलाय.

भारतात वेगवेगळ्या राज्यात त्या भिल्ल आर्ट आणि पिथोरा आर्टच्या कार्यशाळा घेतात. भारताच्या लोक- कलांमध्ये काही अन्य प्रतिभावंत चित्रकारांना सोबत घेऊन त्यांनी भारतीय लोककलेला जागतिक संग्राहलयांमध्ये मानाचं स्थान मिळवून दिलंय. प्रतिभावंत कलाकार असताना देखील त्यांच्या साध्या राहणीमुळं त्यांच्यात इतकी प्रतिभा असेल हे खरं वाटत नाही. एखाद्याकडे जर प्रतिभा असेल तर जगातली कोणतीच ताकद तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही, हे त्या सांगतात. मागे हटून पराभव स्वीकारायचा पर्याय जर तुम्ही सोडलात तर यशाशिवाय पर्याय नाही ही गोष्ट त्यांनी सिद्ध केलीये.

एक सामान्य आदिवासी मुलगी ते जगप्रसिद्ध चित्रकार हा प्रवास त्यांच्यासाठी सोप्पा नव्हता.

त्यांचा चित्रकारीतेचा छंद त्यांना ओळख मिळवून देईल याचा त्यांनी कधीच विचार केला नव्हता. बाहेर देशात जाणं तर खुप दुरची गोष्ट त्यांना तर व्यवस्थीत हिंदीही बोलता यायचं नाही. त्यांचं बालपण अभावात गेलं.
मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात बावडी इलक्यात पिटोल गावात त्या रहायच्या. त्यांचं वय आता ५० वर्षांच्या पार आहे. त्या भिल्ल आदिवासी समूहातून येतात. त्यांच्या गावात अधिकतर लोक ‘पिथोरी पेटींग’ करतात. त्यामुळं लहानपणापासूनच त्यांचा चित्रकारीतेशी संबंध आला.

‘पिथोर कला’ भिल्ल आदिवासी समुहाची कला शैली आहे. गावच्या प्रमुखाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या स्मरणासाठी गावाच्या बाहेर दगड रचले जातातय यातून घोड्याची प्रतिकृती साकारली जाते. ही प्रतिकृतीच पिथोरा केलाला इतर कलांपेक्षा वेगळी बनवते. या कलेचा आधार घेत भुरीबाई यांनी अनेक वेगवेगळ्या डिझाईन बनवल्या आहेत. तसेच त्यांच्या चित्रातून समाज जीवन प्रतिबिंबीत होत असतं.

आजूबाजूचे लोक भुरिबाई यांना घर सजवण्यासाठी बोलवत असत. त्यांना ब्रशबद्दल काहीच माहिती नव्हती. घरातील गेरी, खडी आणि हळद यांच्यापासून रंग बनवायच्या. काळ्या रंगासाठी स्वंयपाकात वापल्या जाणाऱ्या तव्याला खरडून तो काळा रंग म्हणून ते वापरायचे. कधी मोर तर कधी हत्ती तर कधी चिमणी असं वेगवेगळ्या प्रकराच्या डिझाईन त्या बनवत असत.

भुरीबाईंनी अनेक अडचणींना आयुष्यात तोंड दिलंय. मोल मजूरी करण्यासाठी पतिसोबत त्या भोपालला आल्या होत्या. त्यांचा परिवार शहरात झोपडीत रहायचा. इतरांसोबत त्यांनीही मजूरीवर जायला सुरुवात केली. त्यावेळी भोपाळमध्ये भारत भवनच्या निर्माणाचे कार्य सुरु होते. इथेच त्या रोज कामाला जायच्या.

एकदिवस काम सुरु असाताना तिथं एक माणूस आला आणि भुरिबाईंबद्दल विचारणा करु लागला. त्यांना हिंदी न समजत होती न बोलता येत होती. त्यांच्यातल्याच एकानं भाषांतर करुन सांगितलं की “भारत भवनमधील अधिकाऱ्यांना भिल्ल समाजाविषयी काही माहिती हवी आहे. तुमच्यातील कुणाला कलेविषयक माहिती असेल तर सोबत ऑफीसमध्ये या.”

भुरीबाई भिल्ल समाजातून येतात हे त्यांनी सांगितलं लगेचच त्यांना पिथोर बाबाबद्दल विचारणा होऊ लागली. पिथोर कलेबद्दल विचारण्यात आलं. पिथोरी चित्रांबद्दल सांगताना त्यांच्या समोर कागद, पेन्सील, ब्रश आणि रंग ठेवण्यात आले. भुरीबाईंनी पहिल्यांदाच ही सामग्री पाहिली होती. त्यांच्या समोर देशातल्या सुप्रसिद्ध चित्रकारांपैकी एक स्वामीनाथ बसले होते. “मी जर चित्र बनवत बसले तर मजदूरी कोण करेल?” भुरीबाईंनी प्रश्न विचारला. त्यांना मजूरीचे दिवसाचे सहा रुपये मिळायचे. स्वामीनाथ यांनी सांगितलं की चित्र बनवलं तर ते दहा रुपये देतील. हे ऐकून भुरिबाई खुश झाल्या त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. त्यांनी चित्र काढायला सुरुवात करण्याच्या आधी स्वामीनाथन यांना सांगितलं की त्या फक्त सहा रुपये घेतील जास्ती नाही.
भुरीबाईंनी वेगवेगळे चित्र काढले ते स्वामीनाथन यांना आवडले. त्या चित्रांना घेऊन ते दिल्लीला गेले. यानंतर एक वर्षानी ते भुरीबाईंचा पत्ता शोधत त्यांच्या गावी आले होते. त्यांनी अजून काही चित्र बनवून घेतली यावेळी स्वामीनाथन यांनी त्यांना १५०० रुपये दिले. त्यावेळी भुरिबाई यांना कल्पनाच आली नाही की या चित्रांमध्ये काय इतकं वैशिष्ट आहे की, हे लोक त्यांना इतके जास्त पैसे देत आहेत. पण त्या खुश होत्या. कला जपत जपत चांगल्या प्रमाणात पैसा कमवण्याची त्यांना संधी मिळाली होती.

इतर लोकांना ही गोष्ट आवडली नाही. त्यांना पैशांसोबत सन्मानही मिळत होता. पण त्यांच्या समोरच्या अडचणी संपत नव्हत्या. आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या पतिचे कान भरायला सुरुवात केली. भुरीबाई अचानक इतके पैसे कसे कमावत आहेत. चित्रांसाठी इतके पैसे कुणी देत नाही वैगरे सांगून त्यांच्यावर संशय निर्माण करु लागले. भुरीबाईंना नेहमी परिवाराच्या कलहाला तोंड द्यावं लागलं; पण त्यांनी अडचणींपेक्षा मोठं होऊन अडचणी सोडवण्याच्या तयारीत होत्या. त्या नेहमी भारत भवनला असायच्या. त्यांनी ही गोष्ट स्वामीनाथन यांना सांगितली. यावर उपाय म्हणून त्यांच्या पतिला स्वामीनाथन यांनी भारत भवनमध्ये शिपाई म्हणून कामाला लावलं.

यानंतर त्यांच्या पतीला विश्वास बसला की त्या प्रतिष्ठेचं काम करत आहेत. काही दिवसांनंतर मध्यप्रदेश सरकारनं त्यांना पुरस्कारांनी सन्मानित केलं. बातम्या वर्तमानात छापून आल्या. हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा दिवस होता असंही त्या सांगतात. भुरबाई आणि त्यांच्या परिवारानं भारतीय कलांच्या संवर्धनसाठी पुढाकार घेतलाय. आदिवासी समुह आणि कलाकारांच्या विकासाठी त्या सातत्यानं प्रयत्न करत असताना दिसतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button