भिंतीलगत थांबलेल्या अभियंत्याचा ट्रकखाली दबून मृत्यू

Ganesh

औरंगाबाद : सिमेंट कंपनीच्या गोदामात भिंतीलगत थांबलेला अभियंता ट्रकखाली दबून मृत्युमुखी पडल्याची घटना बीड बायपास परिसरातील देवळाई रोडवर गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. गणेश तात्याराव ढोले (३२, रा. जयभवानीनगर) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड बायपास परिसरातील देवळाई रस्त्यावर वंडर सिमेंट कंपनीचे गोदाम आहे. कंपनीचे वरिष्ठ तांत्रिक सहायक गणेश ढोले हे सकाळी १० वाजताच तेथे उपस्थित होते. यावेळी एक चालक सिमेंट नेण्यासाठी ट्रक घेऊन आला होता.

मराठा क्रांती मोर्चा कडून संजय राऊतांच्या पुतळ्याचे दहन

गोदामातील सिमेंट गोण्या पाहत असताना चालकाने अचानक वेगात ट्रक मागे घेतला. तेथे उभ्या असलेल्या मजुरांनी आरडाओरड करून थांबविण्याचे सांगितले. मात्र, चालकाच्या लक्षात येण्याअगोदरच ट्रक गणेश यांच्या अंगावर गेला. यात त्यांचा चेंदामेंदा झाल्याने ते घटनास्थळीच गतप्राण झाले. चालकाला सुनावल्यानंतर त्याने ट्रक मागे घेतला. त्यानंतर गंभीर जखमी गणेशला बाहेर काढून वाहनातून घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले . अपघात विभागातील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याविषयी सातारा पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी ट्रक जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.