सारस्वत बँकेच्या वैभववाडी शाखेत झाला साडेतीन कोटींचा अपहार

Saraswat Bank - Fraud

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी : ग्राहकांचा विश्वास संपादन करून वैभववाडी येथील सारस्वत बँक शाखेतील कर्मचाऱ्याने 3 कोटी 51 लाख 37 हजार रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या कर्मचार्‍याने 28 ग्राहकांच्या लहान मोठ्या ठेवीवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी बँक व्यवस्थापक यांच्या फिर्यादी नंतर पोलिसांनी आरोपी कर्मचारी प्रल्हाद मनोहर मांजरेकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी प्रल्हाद मांजरेकर रा. नाधवडे हा गेली अनेक वर्ष वैभववाडी शाखेत कार्यरत होता. अल्पावधीतच त्याने तालुक्यातील मोठ्या रकमेचे मोठे मासे गळाला लावले होते. तीन महिन्यापूर्वी काही ठेवीदारांनी मांजरेकर याने केलेले प्रताप उघडकीस आल्यानंतर शाखेमध्ये जावून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. या रागातून ठेवीदारांनी अधिकाऱ्याना शिव्यांची लाखोली वाहिली होती. बँकेतील सर्व अधिका-यांनी संगनमताने हा गौडबंगाल केल्याचा आरोप काहींनी केला होता. दरम्यान या घटनेची माहिती तालुकाभर पसरताच ठेवीदारांनी शाखेत गर्दी केली होती. काहींनी ठेवी काढून घेत दुसऱ्या बँकेत ठेवल्या. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र सावध पवित्रा घेत काही ठेवीदारांना विश्वासात घेत बँक बदनाम होणार नाही याची काळजी घेतली. ग्राहकांचे पैसे बुडणार नाहीत असा विश्वास काही अधिकाऱ्यांनी दिला होता. दरम्यान संशयित आरोपी मांजरेकर याच्यावर बँक प्रशासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई केली. तर विभागीय व्यवस्थापकांकडून बँकेतील व्यवहारांची चौकशी सुरू करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER