कोल्हापूर शहरातील औद्योगिक वसाहतीसाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर

कोल्हापूर शहरातील औद्योगिक वसाहती

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील उद्यमनगर, वाय. पी. पवार नगर, पांजरपोळ येथील औद्योगिक वसाहतींना पायाभूत सुविधांसाठी ३ कोटी ५७ लाखांचा प्रशासकीय निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने प्रस्ताव सादर केला होता. औद्योगिक पायाभूत सुविधांची निर्मिती व विकास या योजनेअंतर्गत हा निधी शासनाने मंजूर केला आहे.

या प्रकल्पात कोल्हापूर महानगरपालिका कार्यान्वयन यंत्रणा आहे. या योजनेअंतर्गत शिवाजीनगर उद्यमनगर, वाय. पी. पवार नगर व पांजारपोळ औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते व ९ फूट गटर्स या कामांना मान्यता मिळाली आहे. ही प्रशासकीय मान्यता उदयोग, ऊर्जा व कामगार विभागाच्या सुकाणू समितीच्या पाचव्या बैठकीत देण्यात आली आहे. राज्यात औद्योगिक विकासाला चालना मिळावी यासाठी राज्यात ठिकठिकाणी नियोजनबद्ध औद्योगिक वसाहती स्थापन करण्यात आल्या आहेत. या औद्योगिक वसाहतींना पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी औद्योगिक पायाभूत सुविधांची निर्मिती आणि विकास ही योजना अस्तित्वात आहे.