अमृता शिंपणार चांदणं

Amrita Dhongade

आपल्या आवडत्या अभिनेत्रीची एखादी मालिका संपली की तिची पुढची मालिका कधी येणार याकडे तिच्या चाहत्यांचे नेहमीच लक्ष लागून राहिलेले असते. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतील ठसकेबाज सुमीची भूमिका साकारणारी अमृता धोंगडे (Amrita Dhongade) हिच्या चाहत्यांनाही ती पुन्हा कधी टिव्हीवर दिसणार याची उत्सुकता होती. आता ही उत्सुकता लवकरच संपणार असून अमृता एका नव्या मालिकेत नव्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसमोर येणार आहे. मिसेस मुख्यमंत्री (Mrs. Mukhyamantri)या मालिकेतील एका खानावळ चालकाची धाडसी मुलगी दाखवली होती. आता नव्या मालिकेत ती तिच्या वडिलांचं गॅरेज सांभाळणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी मुलीची भूमिका साकारणार आहे. एक कलाकार म्हणून अशा प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणं हे खरंच मला अभिनेत्री म्हणून भाग्याचे वाटतं असं अमृता धोंगडे सांगते.

मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतील सायकल वरून सगळीकडे फिरणारी, वडिलांचा खानावळीचा व्यवसाय स्वतःच्या हिमतीने चालवणारी इतकेच नव्हे तर एक मुलगी म्हणून कुठल्याही गोष्टीला न घाबरणारी सुमी ही व्यक्तिरेखा अमृताने तिच्या अभिनयातून अत्यंत चांगल्या प्रकारे केली होती. खरेतर या मालिकेचं नाव मिसेस मुख्यमंत्री असे होते आणि मुख्यमंत्री या प्रमुख व्यक्तिरेखेत तिचा नायक हा तेजस बर्वे होता. मात्र अमृताने तिच्या अफलातून अभिनयाने या मालिकेत स्वतःकडे देखील लक्ष वेधून घेतलं होतं. या मालिकेतील तिचे डायलॉग देखील खूप प्रसिद्ध झाले होते. काही महिन्यांपूर्वीच ही मालिका संपली. त्यानंतर अमृता सोशल मीडियावर चाहत्यांना भेटत होती. वेगवेगळे फोटो सेशनही तिचं सुरू होतं. तर दुसरीकडे ती एका नव्या भूमिकेच्या शोधात होती .
चांदणे शिंपीत जाशी या नव्या मालिकेच्या माध्यमातून ती गॅरेज चालवणारी मुलगी ही भूमिका घेऊन येत आहे. तिला वडिलांच्या छोट्याशा गॅरेजचे रूपांतर हे मोठ्या शोरूम मध्ये करायचे आहे आणि त्यासाठी ती कशा पद्धतीने तिची महत्त्वाकांक्षा पूर्ण करते हे दाखवणारी ही तिची भूमिका आहे.

अमृता सांगते खरंच आज जगामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये मुली त्यांचे कर्तृत्व सिद्ध करत आहेत. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या किंवा पुरुषांचा जास्तीत जास्त सहभाग असलेले क्षेत्रही आज मुलींना वर्ज्य नाही हे आपण पाहतो. शिवाय अनेक कुटुंबाची जबाबदारी देखील मुली समर्थपणे घेत आहेत. या मालिकेत देखील चारू या व्यक्तिरेखेच्या वडिलांची वडिलांचे गॅरेज आहे मात्र ते व्यसनाधीन झाल्याने आता ते गॅरेज नीट चालत नाही. शिवाय तिचा भाऊ देखील शिक्षण घेत आहे त्यामुळे तिलाच पदर खोचून गॅरेज चालवण्याची जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागते. अशी ही कथा आहे आहे. या नव्या मालिकेची सुरुवात डिसेंबरच्या अखेरीला होणार असून सध्या अमृता या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

कोरोना काळात मिसेस मुख्यमंत्री या मालिकेचे चित्रीकरण काही दिवस थांबले होते. त्या काळात अमृता कोरोना काळातील कलाकारांची मानसिकता याबाबत सातत्याने तिच्या सोशल मीडिया पेजवर व्यक्त होत होती. तिचे हे व्हिडिओदेखील खूप व्हायरल झाले होते आणि त्याबद्दल तिच्या चाहत्यांकडून तिला कौतुकाच्या अनेक कमेंट देखील मिळाल्या होत्या. तर दुसरीकडे अमृता चर्चेत आली ती तिची ऑनलाइन फसवणूक झाली तेव्हा. इन्स्टा अकाउंट हॅक करून ते पुन्हा अॅक्टीव करण्यासाठी तिच्याकडे 40 हजार रुपयांची मागणी केली होती. तिने हा अनुभव देखील ऑनलाईन शेअर करत अशा कुठल्याच प्रकारच्या गोष्टीला बळी पडू नका हे सांगत सावधानतेचा इशारा देखील दिला होता. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेनंतर चांदणे शिंपीत जाशी या तिच्या मालिकेसाठी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमृता

मुळची पुण्याची असून तिने एम एस्सीपर्यंतचे शिक्षण पुण्यातच पूर्ण

केले. कॉलेजमध्ये असताना तिला अभिनयाची आवड लागली. मिथुन या सिनेमाच्या माध्यमातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर मिसेस मुख्यमंत्री ही मालिका करण्याची संधी तिला मिळाली. आता तिची ही दुसरी मालिका म्हणजे चांदणे शिंपीत जाशी लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. खऱ्या आयुष्यातही अमृता धाडसी मुलगी आहे. कोणत्याही चुकीच्या गोष्टीवर ती लगेच व्यक्त होते. त्यामुळेच तिच्या नव्या मालिकेतील चारू ही महत्त्वाकांक्षी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अमृताला तिच्या वास्तव आयुष्यातील स्वभाव नक्कीच मदत करेल यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER