अमरावती विद्यापीठाकडून ३५ महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यास नकार

अमरावती : अमरावती विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू असलेल्या ३५ महाविद्यालयांवर गंडांतर आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाकरिता ४० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या ३५ महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यास विद्यापीठ प्रशासनाने नकार दिला आहे. या संदर्भात संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना नोटिसी बजावून या अभ्यासक्रमांच्या परीक्षेशी संबंधित कार्य त्यांनाच करायला सांगण्यात आलं आहे.

‘दोन किंवा तीन महाविद्यालयात सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यासाठी तितक्याच मनुष्यबळाची गरज भासते. त्यामुळे आता कमी विद्यार्थी संख्या असलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेची जबाबदारी त्याच महाविद्यालयांवर सोपविली आहे. कुलगुरूंच्या आदेशानुसार प्राचार्यांना नोटिसी बजावण्यात आल्या आहेत.

अमरावती विद्यापीठांतर्गत यवतमाळ, वाशिम, बुलडाणा,अकोला व अमरावती या पाच जिल्ह्यांत एकूण ४१० महाविद्यालये आहेत. मात्र, पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू असलेल्या ३५ महाविद्यालयांत ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेशित विद्यार्थी संख्या आहे. परंतु महाविद्यालय व्यवस्थापन विद्यार्थी संख्या कमी असतानासुद्धा हे अभ्यासक्रम सुरूच ठेवतात. ही बाब कुलगुरुंनी गठित केलेल्या त्रीसदस्यीय समितीच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे तीन किंवा त्यापेक्षा कमी महाविद्यालयात शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेची जबाबदारी आता त्याच महाविद्यालयांवर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्वत परिषदेच्या शिफारशीनुसार तीन किंवा त्यापेक्षा कमी महाविद्यालयांत शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाची परीक्षा संबंधित महविद्यालयांनी संचालित आणि कार्यान्वित करण्यासंदर्भात कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी त्रीसदस्यीय समिती गठित केली होती. सदर समितीच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेने २० जून २०१७ रोजी ही बाब विषय क्रमांक १४० वरील चर्चेच्या अनुषंगाने मान्य केली. त्यामुळे आता ४० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्यास त्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे संचलन त्या-त्या महाविद्यालयांना करावे लागेल.

या निर्णयानुसार अमरावती विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू असलेल्या ३५ महाविद्यालयांवर गंडांतर आले आहे. यावर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून सदर अभ्यासक्रमांच्या परीक्षेशी संबंधित कामे आता महाविद्यालयांनाच करावे लागतील. ही बाब प्राचार्यांना पाठविलेल्या नोटीशीद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे.