अमरावती शिक्षक मतदारसंघात जोरदार लढत : जिंकणार कोण?

Shrikant Deshpande - Nitin Dhande

राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये १ डिसेंबरला निवडणूक होत असून अमरावती शिक्षक मतदारसंघात प्रचंड चुरस दिसून येत आहे. विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांना तगड्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे संघ परिवाराशी संबंधित दोन उमेदवार उभे राहिल्याने परिवाराचा कौल कोणाला मिळणार यावर बरेच काही अवलंबून असेल.

श्रीकांत देशपांडे हे यावेळी शिवसेनेचे (Shiv Sena) अधिकृत उमेदवार आहेत. त्यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) या दोन पक्षांनी पाठिंबा दिला असला तरी या दोन्ही पक्षांच्या अनेक नेत्यांचे अन्य काही उमेदवारांशी स्रेहाचे संबंध असल्याने तिन्ही पक्ष देशपांडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे चित्र नाही.

भाजपने (BJP) नितीन धांडे (Nitin Dhande) हा कर्तृत्ववान चेहरा दिला आहे. ते एमबीबीएस आहेत. माजी मंत्री राम मेघे यांनी स्थापन केलेल्या विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी या नामांकित शिक्षक संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांची पाटी कोरी आहे आणि कुठल्याही वादात त्यांचे नाव आलेले नाही. देशपांडे यांनी गेल्या सहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात दुखावलेले लोक त्यांच्याविरुद्ध प्रचाराला भिडले आहेत. देशपांडे हे ब्राह्मण कार्ड खेळत असल्याचे दिसते पण संघ परिवाराशी संबंधित ब्राह्मण शिक्षकही यावेळी नावावर न जाता धांडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील, असे चित्र आहे. मात्र संघ परिवाराशी संबंधित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राजकुमार बोनकिरे यांना दिलेली उमेदवारी ही धांडे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र, धांडे यांच्यासाठी भाजपचे कॅडर जोरदार तयारीला लागले आहे. संघ परिवारही त्यांच्या पाठीशी दिसतो.

माजी मंत्री आणि भाजपचे नेते डॉ.अनिल बोंडे यांच्या भगिनी आणि शिक्षक नेत्या संगीता शिंदेही मैदानात उतरल्या आहेत. बोंडे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियात टाकला असून त्यात माझ्या बहिणीने भाऊबीजेच्या ओवाळणीत मला पाठिंबा मागितला वगैरे भावनिक संवाद आहे पण शेवटी मी भाजपचा आहे व राहील, असे बहिणीला सांगितल्याचेही व्हिडिओमध्ये शेवटी आहे. बोंडे यांनी भाजपचे नितीन धांडे यांच्यासाठी स्पष्टपणे समोर आले पाहिजे, अशी भाजप परिवारात भावना आहे. पूर्वी नुटा, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि विजुक्टा या तीन प्रमुख शिक्षक संघटना एकत्र लढायच्या पण यावेळी त्या आमनेसामने आहेत. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने सहकारातील बडे नाव असलेले प्रकाश काळबांडे यांना मैदानात उतरविले आहे. नुटाकडून अविनाश बोरडे रिंगणात आहेत. बोरडे यांनी गेल्या दोन पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे आमदार डॉ.रणजित पाटील यांचा हिरिरीने प्रचार केला होता. पाटील यांचा पाठिंबा आम्हालाच आहे असा दावा बोरडे यांचे समर्थक करीत आहेत. या शिवाय अपक्ष शेखर भोयरही भाग्य अजमावित आहेत.

अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमधील ३५ हजार ६२२ शिक्षक या ठिकाणी मतदार आहेत. मुख्य लढत धांडे विरुद्ध देशपांडे अशी होण्याची शक्यता आहे. पहिल्या पसंतीची साडेपाच हजार मते जो मिळवेल त्याच्या गळ्यात विजयश्री पडेल असे मानले जाते. जातीय, पक्षीय समीकरणे लक्षात घेता आजतरी धांडे यांना अ‍ॅडव्हान्टेज दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER