अन् शिवसैनिक लाठ्याकाठ्या घेऊन स्मशानभूमीत धडकले !

मुंबई : अमरावती शहरातील हिंदू स्मशानभूमीत (Hindu cemetery) लावण्यात येणाऱ्या गॅस दाहिनीवरून शिवसेना (Shivsena) व भारतीय जनता पक्षाच्या  (BJP) कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली . गॅस दाहिनीला (gas-crematorium) विरोध करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमवारी शिवसैनिक थेट लाठ्याकाठ्या घेऊन स्मशानभूमीत पोहचले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अमरावतीमधील हिंदू स्मशानभूमीत जिल्हा प्रशासनातर्फे गॅस दाहिनी उभारण्यात येत आहे. त्यावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले आहेत. भाजपने गॅस दाहिनी बसवण्यास विरोध केला आहे. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिकांसह तिथे मूक आंदोलन केले होते. त्यानंतर भाजपच्या काही नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी गॅस दाहिनीला विरोध करत आंदोलन केले होते. तसेच, तिथं मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात भाजपची साथ दिली होती.

मात्र हा विरोध झुगारून महापालिका व जिल्हा प्रशासनानं गॅस दाहिनी उभारण्याचं काम सुरू केलं होतं. या कामाला विरोध करण्यासाठी कुलकर्णी यांच्यासह भाजपचे काही कार्यकर्ते येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मिळाली. ही माहिती मिळताच शिवसेनेचे शहरप्रमुख पराग गुढदे यांनी शिवसैनिकांसह लाठ्याकाठ्या घेऊन तिथं धाव घेतली. हिंमत असेल तर कुलकर्णी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून दाखवावा. त्यांना लाठ्यांचा प्रसाद देऊ, असा इशारा शिवसेनेचे पराग गुढदे यांनी यावेळी दिला. घटनास्थळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी या परिसरात कडेकोड बंदोबस्त तैनात केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button