ठाकरे सरकारकडून अंगणवाडी सेविकेच्या कुटुंबीयांना 50 लाखांचा धनादेश

amravati-news-thackeray-government-provides-rs-50-lakh-to-anganwadi-worker-ushatai-punds-family

मुंबई : राज्यात कोरोनाच्या संकटमय काळात आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या कोविड योद्ध्या आणि अंगणवाडी सेविका उषाताई पुंड (Ushatai Pund) यांच्या कुटुंबीयांना महाविकास आघाडी सरकारने मदत केली आहे .

पुंड यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांचा धनादेश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला आहे. अंगणवाडी सेविकेच्या कुटुंबाला राज्यातली ही पहिली मदत ठरली आहे.

कोरोना काळात अनेक अंगणवाडी सेविकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडीतील बालकांना घरोघरी आहार पोहोचून दिला. यात राज्यातील 8 अंगणवाडी सेविकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यातील अमरावती जिल्ह्यातील रामा येथील उषाताई पुंड एक होत्या.त्यांनी कोरोनाच्या काळात जेव्हा सगळे लोक घरात असायचे त्यावेळी मात्र उषाताई यांनी घरोघरी जाऊन बालकांना पोषण आहार पोहोचून दिला. यातच त्यांना कोरोनाची लागण झाली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

यामुळे मात्र आज शासनाच्या वतीने राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी सेविका उषाताई पुंड यांच्या कुटुंबीयांना घरी जाऊन त्यांचे सांत्वन करून 50 लाख रुपयांची मदत धनादेशाद्वारे दिली. ‘शासन कोरोना लढवय्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे’, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER