आशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण? पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल

अकोला : दिल्लीतील हिंसाचार ज्यांनी घडवून आणला त्यांच्याबद्दल महाविकास आघाडीचे नेते का बोलत नाहीत, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. दिल्ली हिंसाचाराला जबाबदार असलेले अभिनेते दीप सिद्धू हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं समोर आलं आहे. त्यावर शेलार का बोलले नाहीत? असा परखड सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा:- शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत? आशिष शेलारांची टीका 

तसेच सिद्धू तुमचा कोण लागतो? असा सवालही त्यांनी केला आहे. मिटकरी यांनी ट्विट करून आशिष शेलार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम असून केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्याचे मूकपणे समर्थन करीत आहेत. दिल्लीच्या हिंसाचारामागे भाजपचा कार्यकर्ता दीप सिद्धू असल्याचा आरोप शेतकरी का करत आहेत? याचे उत्तर शेलार यांनी दिले नाही, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.

मिटकरी यांनी दोन ट्विट करून शेलार यांना घेरलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये तर त्यांनी थेट दीप सिद्धूवरून शेलारांना सवाल केला आहे. आशिष शेलार साहेब, खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण? असा तिखट सवाल त्यांनी शेलार यांना केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER