‘सरकार पाडणारे नेमके साधुसंत कोण?’ राष्ट्रवादीचे आमदार मिटकरी भोसलेंवर गरजले

Amol Mitkari - Tushar Bhosale

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) हे मोगलांपेक्षा वाईट आणि ब्रिटिशांपेक्षा काळे सरकार आहे. ठाकरे सरकार साधुसंतांशी चर्चा करायला तयार नाही. मंदिरे उघडी करणे हा श्रद्धेचा विषय आहे. मात्र सत्तेसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हिंदुत्व विसरले अशी जहरी टीका, भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी केली आहे. राज्यातील मंदिरं सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या (BJP) आध्यात्मिक आघाडीने तुळजाभवानी मंदिर (Tulja Bhavani Temple) परिसरात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. पण नगरपरिषदेने आंदोलन स्थळावरील तंबू रातोरात उखडून टाकले. तसंच तुषार भोसले यांना तुळजापूर पोलिसांनी नोटीसही बजावली. इतकंच नाही तर तुळजापूर मंदिर परिसरात जमावबंदी लागू केली. त्यानंतर भोसले यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले.

भोसले यांनी केलेल्या आरोपावर राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. साधुसंत सरकार पाडतील, साधुसंत म्हणजे नेमके कोण? ते आंदोलन करणारे भोसले स्वतःला साधुसंत म्हणवून घेत आहेत. मग साधुसंतांची नक्की व्याख्या कोणती? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित करत जातीय द्वेष पसरवणं ही साधुसंतांची व्याख्या असते का? वारकरी समाज हा साधाभोळा समाज आहे. हा वारकरी समाज विठ्ठल संप्रदायाला प्रमाण मानतो. इथे तुकोबारायांची, ज्ञानेश्वरांची, चोखोबारायांची परंपरा आहे. या महाराष्ट्राला गाडगेबाबांपर्यंतची परंपरा आहे. वारकरी संप्रदाय जातीय द्वेष शिकवत नाही, असंसुद्धा अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

स्वतःला तुम्ही संतसाधू म्हणवून घेता, तुम्हाला हरिपाठ तरी पूर्ण पाठ आहे का? धर्माच्या नावावर वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं काम हे काही लोक करत आहेत, असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत. मी स्वतः वारकरी आहे. हे मूठभर मोजके लोक यांनी मुद्दामहून सोडलेले आहेत, जेणेकरून जनतेचं लक्ष विचलित करता येईल. हा विकास आघाडीला बदनाम करण्यासाठी अशी टोकाची भाषा वापरली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपने मूठभर लोकांना बाहेर सोडले आहे. वारकरी संप्रदायाला राजकीय रंग देऊन महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न अशा लोकांकडून केला जात आहे. अशा लोकांपासून वारकरी संप्रदायाने सावध राहावे. काही नेते लोकांचे प्रश्न विचलित करण्यासाठी असे उद्योग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER