पवारांशी चर्चा : खासदार अमोल कोल्हे आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार

amol-kolhe-will-meet-delhi-farmers

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांची डॉ. कोल्हे (Amol Kolhe) भेट घेणार आहेत. त्यांच्या व्यथा समजावून घेणार आहेत.

याबाबत माहिती देताना अमोल कोल्हे म्हणाले की, अत्यंत दुर्दैवी आहे की, देशातील शेतकऱ्यांना या पद्धतीने आपल्या हक्कांसाठी आंदोलन करावे लागत आहे. तसंच त्या आंदोलनाची देशाच्या प्रमुखाकडूनच खिल्ली उडवली जाते. हे आंदोलन बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. त्यांना खालिस्तानी म्हणत देशद्रोही संबोधलं जात आहे. पण सरकारने हे लक्षात ठेवावं की सत्ता येते-जाते. पण बळीराजा तुम्हाला-आम्हाला पोसण्यासाठी काबाड कष्ट करत असतो. आपण दोन घास खावेत म्हणून तो राबत असतो. शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घ्या. एक पाऊल पुढे टाका, असं आवाहन डॉ. कोल्हे यांनी केलं. गुरुवारी आम्ही शेतकऱ्यांना भेटायला जाणार आहोत, असं सांगत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हे सांगायला त्यांना भेटायला जाणार आहे. त्यामध्ये राजकीय हेतू कोणता नाही.

हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत, असं सरकार सांगत आहे; पण हे कायदे जर फायद्याचे असते तर शेतकऱ्यांनी आंदोलन का केले असते? हे सरकारने समजून घ्यायला हवे. सरकारने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवर हा चेष्टेचा विषय होऊ नये. देशाचे प्रमुख जेव्हा ‘आंदोलनजीवी’सारखा शब्द वापरतात हे या देशाचे दुर्दैव असल्याची घणाघाती टीका कोल्हे यांनी मोदींवर केली.

आंदोलन चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करायला हवा. शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न समजून घ्यायला हवा. ठरावीक मूठभर उद्योगपतींना फायदा व्हावा यासाठी हे सरकार वागत आहे. त्यामुळे हा असंतोषाचा भडका एक दिवस नक्की उडेल. जेव्हा परदेशात हाऊडी मोदी ऐकायला मिळतं तेव्हा आम्ही टाळ्या वाजवल्या. ज्या वेळेस परदेशातील कोणी मानवतेच्या दृष्टीने ट्विट करतात त्याला आम्ही विरोध करायचा हे योग्य नाही. ज्या ठिकाणी जय जवान जय किसान घोषणा होती तिथे जवान विरुद्ध किसान परिस्थिती तयार करण्यात आली आहे, असा आरोप कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER