ऋषी कपूर यांच्या जागी अमिताभ काम करणार दीपिका पदुकोणसोबत

Maharashtra Today

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या वयाचे कलाकार एक तर बॉलिवूडमधून बाहेर फेकले गेले आहेत किंवा कॅरेक्टर रोल करू लागले आहेत. अमिताभ बच्चन यांना मात्र मुख्य आणि महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे. हे त्यांच्या अभिनयाचेच यश आहे यात शंका नाही. नव्या नायकाला पटापट सिनेमे मिळण्याची मारामारी असते तेथे अमिताभ बच्चन यांच्याकडे छोट्या पडद्यावरील गेम शो आणि सिनेमांच्या ऑफर्स एकामागोमाग एक येत आहेत. आताही अमिताभ बच्चन यांनी एक नवा सिनेमा साईन केला असून या सिनेमाची निर्मिती हॉलिवूडची कंपनी करीत असून यात त्यांच्यासोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) दिसणार आहे.

वॉर्नर ब्रदर्स आणि यूनिव्हर्सल पिक्चर्स या हॉलिवूडमधील सिनेमांची निर्मिती करणाऱ्या दोन मोठ्या संस्था आहेत. बॉलिवूडमधील सिनेमांची लोकप्रियता आणि कमाई बघून त्यांनीही हिंदी सिनेमाची निर्मिती करण्यासाठी मुंबईत पाऊल ठेवले होते. काही सिनेमे या कंपनीने सुरु केले. पण कोरोना आणि नंतर बॉलिवूडमधील लोकांचे वागणे, त्यामुळे झालेले नुकसान त्यामुळे या दोन कंपन्यांनी हिंदी सिने निर्मितीचा नाद सोडून दिला. या दोन्ही कंपन्यांनी मिळून हॉलिवूडच्या सुपरहिट ‘द इंटर्न’ सिनेमाची हिंदी रिमेक करणार असल्याची घोषणा गेल्या वर्षी केली होती. एक वकील आणि त्याची इंटर्न यांची कथा या सिनेमात मांडण्यात आलेली आहे. यासाठी वकिलाच्या भूमिकेत ऋषी कपूर तर इंटर्नच्या भूमिकेत दीपिका पदुकोणला घेण्यात आले होते.

खरे तर गेल्या वर्षीच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार होती. पण लॉकडाऊन लागू झाले. त्यातच ऋषी कपूर यांचेही निधन झाले. त्यामुळे हा सिनेमा बंद होतो की काय अशी चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु झाली होती.

मात्र एक-दोन महिन्यांपूर्वी स्वतः दीपिकानेच, वॉर्नर आणि यूनिव्हर्सने या सिनेमाची निर्मिती करायचीच असे ठरवल्याने हा सिनेमा तयार होणार असून नव्या अभिनेत्याचा शोध सुरु केला असल्याचे सांगितले होते. हा शोध अमिताभ बच्चन यांच्या रुपाने आता संपला आहे. ऋषी कपूर यांच्या जागी वकिलाची भूमिका करण्यासाठी अमिताभ बच्चन यांना विचारण्यात आले होते. अमिताभ यांनीही सिनेमात काम करण्यास होकार दिल्याचे समजते. दीपिका आणि अमिताभने यापूर्वी ‘पीकू’ सिनेमात एकत्र काम केले होते. आता हा त्यांचा दुसरा सिनेमा आहे ज्यात हे दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER