अमिताभ बच्चन वादांचाही ‘शहेनशाह’

Amitabh Bachchan

गेल्या पाच दशकांपासून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) बॉलिवूडमध्ये काम करीत आहेत. आज ७७ व्या वर्षीही ते त्याच तडफेने काम करीत आहेत, ज्या तडफेने त्यांनी १९६९ मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटात केले होते.

अजूनही अमिताभला केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाची निर्मिती केली जाते. त्यामुळेच त्यांना महानायक म्हटले जाते. भारतात चित्रपटांना सुरुवात होऊन एक शतक पूर्ण झाले. त्यापैकी पाच दशके तर अमिताभ चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. या पाच दशकांमध्ये चित्रपटांसोबतच अनेक वादातही हा महानायक सापडला; पण प्रत्येक वेळी त्याने वादावर मात केली आणि पुढे सरकला. असा एकही वाद नाही जो अमिताभला चिकटला नाही. अगदी नायिकेच्या आरोपांपासून ते लाच घेण्यापर्यंत अनेक आरोप अमिताभवर झाले. पण त्यांची प्रेक्षकांमधील क्रेझ मात्र कधीच कमी झाली नाही. आज आपण अमिताभशी जोडल्या गेलेल्या वादावर एक नजर टाकू या-

पंतप्रधान राजीव गांधी यांचे मित्र असल्याने काँग्रेसच्या तिकिटावर अमिताभ खासदार झाले. त्याच दरम्यान बोफोर्स घोटाळ्यात अमिताभचे नाव आले. पनामा पेपर्समध्येही अमिताभचे नाव आले होते. त्यामुळेच अमिताभने राजकारण सोडले होते आणि माध्यमांशी कट्टीही घेतली होती. हा अमिताभचा पहिला वाद होता. अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये काम केल्याने अमिताभने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याचे ठरवले. अनेक नायकांनी चित्रपट निर्मितीच्या संस्था स्थापन केल्याने अमिताभ बच्चननेही १९९६ मध्ये अमिताभ बच्चन कार्पोरेशन लि. म्हणजेच एबीसीएलची स्थापना केली. आपल्या या संस्थेमार्फत उत्कृष्ट चित्रपट तयार करण्याची योजना त्यांनी आखली होती.

नवीन कलाकार, दिग्दर्शकांना संधी देण्याचाही त्यांचा विचार होता. चार वर्षांत म्हणजे २००० पर्यंत कंपनीचा व्यवसाय १० बिलियन म्हणजेच १०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा अमिताभचा विचार होता. अरशद वारसी आणि सिमरन अभिनीत ‘तेरे मेरे सपने’ बनवून त्यांनी चित्रपट निर्मिती सुरू केली. यानंतर आणखी काही चित्रपटांची निर्मिती केली. तसेच ऑडिओ कॅसेट, टीव्ही सीरियल आणि इव्हेंटच्या क्षेत्रातही एबीसीएलने उतरण्याचे ठरवले होते. त्यानुसार बंगलोरमध्ये मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धाही आयोजित केली.

मात्र टीममध्ये चांगली माणसे नसल्याने कंपनीचा तोटा वाढू लागला आणि अखेर कंपनीला दिवाळखोर म्हणून घोषित करावे लागले. कर्ज चुकवण्यासाठी त्यांना घरदार विकावे लागणार होते. पण न्यायालयात वेळ मागून घेतली आणि नंतर पुन्हा चित्रपटात काम करीत सगळी कर्जे चुकवली. पण त्यावेळी अमिताभने मुद्दाम कंपनी डबघाईला आणली आणि गुंतवणूकदारांचे पैसे परदेशात वळवले असा आरोप करण्यात आला होता. अर्थात अमिताभने याला काहीही उत्तर दिले नाही; परंतु ते चांगल्याच वादात सापडले होते. त्यानंतर मात्र अमिताभने केबीसी आणि चित्रपटात काम करून आतापर्यंत एकूण २६६७ कोटी रुपयांची संपत्ती जमवली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात जया बच्चन यांनीच ही माहिती दिली आहे. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन चष्म्याला घेऊन वादात सापडले होते. कर्ज चुकवण्यासाठी काम करीत असतानाच बातमी आली की, अमिताभने स्वतःसाठी एक कोटी रुपये खर्च करून चष्मा खरेदी केला आहे.

सगळीकडे ही बातमी पसरल्यानंतर तर अमिताभने गुंतवणूकदारांना फसवले असल्याची चर्चा जोरात सुरू झाली. तेव्हा याबाबत बोलताना अमिताभने सांगितले होते, मी एक कोटी रुपयांचा चष्मा विकत घेतलेला नाही. कोणी तरी अशीच अफवा पसरवली आहे. मी एक कोटी रुपयांचा चष्मा कसा विकत घेऊ शकेन. मी असाच कुठे तरी विकत घेतला असेल किंवा कोणी तरी भेट दिला असेल. त्याचा फोटो छापून आल्यानंतरच या बातम्या आल्या. पण माझा चष्मा एक कोटी रुपयांचा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. आता ताजा ताजा वाद म्हणजे कोरोना काळात अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात उपचारासाठी भरती झाले होते. तेव्हा अशी बातमी आली की, अमिताभ नानावटीचा एक संचालक असल्याने नानवटीचा प्रचार व्हावा म्हणून मुद्दाम तेथे भरती झाले. तेव्हा अमिताभने पुन्हा एकदा सोशल मीडियावर याबाबतची सत्यता जाहीर करीत आपण नानावटीचे संचालक नसल्याचे स्पष्ट केले होते.

एवढेच नव्हे तर आता काही दिवसांपूर्वी अमिताभने आलिशान मर्सिडीज बेंझ विकत घेतली तेव्हाही लोकांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. कोरोनामुळे लोकांच्या नोकऱ्या जात असताना, लाखो लोक उपाशी असताना अमिताभला अशी उधळपट्टी करणे शोभते का, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला होता. अमिताभने एकदा म्हटलेच होते, प्रशंसक दुधारी तलवार असते. ते जसे डोक्यावर घेतील तसेच पायदळीही तुडवतील म्हणून त्यांच्या कलाने घ्यायचे असते. आज अमिताभ तेच करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER