अमिताभचा ‘चेहरे’ तीन आठवडे अगोदरच रिलीज होणार

Amitabh Bachchan Chehre

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अभिनीत ‘चेहरे’ (Chehre) सिनेमा खरे तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज केला जाणार होता, पण तेव्हा मोठे सिनेमे रिलीज होणार असल्याने अमिताभचा सिनेमा आता तीन आठवडे अगोदर म्हणजे ९ एप्रिलला रिलीज केला जाणार आहे. या सिनेमात अमिताभसोबत इमरान हाशमीही (Emraan Hashmi) असून याचे दिग्दर्शन रुमी जाफरी करीत आहेत. या सिनेमाचा पहिला टीझर नुकताच रिलीज करण्यात आला असून या टीझरमध्येच सिनेमाच्या रिलीजची नवी तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

खरे तर अमिताभचा हा सिनेमा गेल्या वर्षीच रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे सिनेमाचे शूटिंग पूर्ण होऊ न शकल्याने सिनेमा रिलीज होऊ शकला नव्हता. लॉकडाऊननंतर थिएटर पुन्हा सुरु झाली आणि सिनेमे रिलीज करण्याचा धडाका सुरु झाला आहे. चेहरेच्या निर्मात्यांनी त्यांचा सिनेमा ओटीटीवर रिलीज न करता थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आणि ३० एप्रिल ही तारीख बुक केली. त्यानुसार तयारीही सुरु केली. पण आता अचानक सिनेमा लवकर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सिनेमात सिद्धांत कपूर, क्रिस्टल डिसूजा, रघुवीर यादव, अन्नू कपूर यांच्या भूमिका असून आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने याची निर्मिती केली आहे.

कोरोनामुळे थिएटर बंद असल्याने गेल्या वर्षी हा सिनेमा रिलीज होऊ शकला नव्हता. त्यामुळे अमिताभच्याच ‘गुलाबो सिताबो’प्रमाणे हा सिनेमाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल असे म्हटले जात होते. पण निर्मात्यांनी थिएटर रिलीजचा आग्रह धरला आणि एप्रिलची डेट फिक्स केली होती. पण आता निरमाते हा सिनेमा लवकर रिलीज करणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन एका निवृत्त वकिलाची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाचा पहिला टीझर इमरान हाशमीने रिलीज करीत सिनेमाच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. या टीझरसोबत इमरान हाशमीने लिहिले आहे, “न्यायालयात खेळाची सुरुवात झाली आहे.” विशेष म्हणजे या सिनेमात सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्स पुरवण्याचा आरोपी असलेली रिया चक्रवर्तीचीही भूमिका आहे. पण सिनेमाच्या पहिल्या पोस्टरवर रियाला स्थान देण्यात आले नव्हते आणि आता टीझरमध्येही रियाचा पत्ता कट करण्यात आला आहे. खरे तर रियाने गेल्या वर्षी या सिनेमातील तिच्या लुकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे रिया या सिनेमात असल्याचे माहित झाले होते. पण आता ती न्यायालयीन खटल्यात असल्याने निर्मात्यांनी पोस्टर आणि टीझरमधून रियाचा पत्ता कट केल्याचे म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER