अमिताभ बच्चन, अक्षयकुमारचे शूटिंग व चित्रपट महाराष्ट्रात बंद पाडू – नाना पटोले

Akshay Kumar - Amitabh Bachchan - Nana Patole

भंडारा :- मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel), स्वयंपाकाच्या गॅस दरांमध्ये प्रचंड वाढ केली आहे. आज पेट्रोल १०० रुपये लिटर तर घरगुती गॅस सिलेंडर ८०० रुपये एवढा महाग झाला असून सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. मोदी सरकारविरोधात लोक संताप व्यक्त करत आहेत. केंद्रात काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार असताना पेट्रोलच्या दरवाढीविरोधात अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करून सरकारवर टीका केली होती. मात्र आज यूपीए सरकारवेळी असलेल्या दरापेक्षा मोठी दरवाढ झाली असतानाही हे सेलिब्रिटी मूग गिळून गप्प बसले आहेत. भाजपाच्या इशाऱ्यावर टिव टिव करणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अक्षयकुमार (Akshay Kumar) यांचे चित्रपटांचे शूटिंग व चित्रपट महाराष्ट्रात बंद पाडू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.

मोदी सरकारने लादलेल्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) पाठिंबा देण्यासाठी भंडाऱ्यात आज नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेसप्रणीत यूपीएचे सरकार हे लोकशाही मार्गाने चालणारे, संविधानावर चालणारे सरकार होते. त्यामुळेच अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह असंख्य सेलिब्रिटी सरकारविरोधातही आवाज उठवत होते. आज या मंडळींनी मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवणे अपेक्षित असताना ते भाजपाच्या हातचे बाहुले बनले आहेत. महागाई, शेतकऱ्यांवरील अत्याचाराविरोधात आता सेलिब्रिटी बोलत नाहीत. म्हणूनच काँग्रेसने या भाजपाच्या पोपटांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, असे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जगभरातील सेलिब्रिटींनी पाठिंबा देताच या सेलिब्रिटींना ट्विट करून मोदी सरकारची तळी उचलण्याचे काम केले.

८५ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत आंदोलन करत आहेत. भारतीय जनता पार्टी, भाजपाचा आयटी सेल यांनी या आंदोलनाला खलिस्तानी, नक्षलवादी, दहशतवादी म्हणून बदनाम केले. त्यावेळीही या सेलिब्रिटींनी मौन पाळले. परंतु भाजपाच्या आयटी सेलच्या सांगण्यावरून त्यांनी शेतकरीविरोधी ट्विट केले. हे सेलिब्रिटी भाजपाच्या आयटी सेलचे पोपट आहेत का? असा सवालही पटोले यांनी विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER