अमित ठाकरे पुन्हा बंधपत्रित नर्सेसच्या मदतीला; सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Amit Thackeray

मुंबई :- कोरोनाशी दोन हात करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बंधपत्रित नर्सेस यांच्या पगारात अजूनही कपात केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मनसे नेते अमित ठाकरे यांनी परत एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बंधपत्रित नर्सेस यांची पगारकपात रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया देत सरकारला टोला लगावला आहे.

सध्याच्या कोरोना संकटकाळात बंधपत्रित नर्सेस अत्यंत महत्त्वाची आरोग्यसेवा बजावत आहेत. ‘कोविड योद्धे’ असा त्यांचा शाब्दिक गौरव करून त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. बंधपत्रित नर्सेसच्या समस्यांबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राज्यातील बंधपत्रित डाॅक्टर्स आणि अधिपरिचारिका (नर्सेस) यांच्या पगारातील कपात रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. या मागणीनंतर राज्य सरकारने बंधपत्रित डाॅक्टरांचा पगार सुमारे १५-२० हजारांनी वाढवला, म्हणजे पूर्ववत केला. दुर्दैवाने, बंधपत्रित नर्सेसबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही.

बंधपत्रित नर्सेसना (ज्यात सिस्टर्स आणि ब्रदर्स दोन्ही येतात) कोरोना संकटकाळाच्या आधी रु ३५,००० ते रु. ४५,००० मासिक मानधन मिळत होते. २९ एप्रिलच्या शासन आदेशाद्वारे त्यांचे मानधन रु २५,००० करण्यात आले.

२०१५पर्यंत या बंधपत्रित नर्सेसना सेवेत कायम केलं जात होतं. मात्र, २०१५ नंतरच्या नव्या बंधपत्रित नर्सेसना कायम सेवेत घेण्याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. म्हणजे, एकीकडे नोकरीची असुरक्षितता आणि दुसरीकडे पगारकपात असा दुहेरी अन्याय बंधपत्रित नर्सेसवर होत आहे.

सध्याच्या कोविड संकटकाळात बंधपत्रित नर्सेस अत्यंत मोलाची आरोग्यसेवा देत आहेत. ‘कोविड योद्धे’ असा त्यांचा शाब्दिक गौरव करून त्यांच्या समस्या सुटणार नाहीत. बंधपत्रित नर्सेसच्या समस्यांबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER