अमित शहांचे निटकवर्ती तिरथसिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

tirath singh rawat

नवी दिल्ली :- उत्तराखंडचे मुख्यमंत्री (CM of Uttarakhand) त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मंगळवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. विशेष म्हणजे काही नावांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र बुधवारची सकाळ उजाडताच भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी तिरथसिंह रावत (Tirath Singh Rawat) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. २०१७ साली ज्या नेत्याला आमदारकीचं तिकीट नाकारलं होतं, अशा नेत्याकडे आता संपूर्ण राज्याची जबाबदारी भाजपनं सोपवली आहे.

उत्तराखंडमध्ये मागील विधानसभा निवडणुकीवेळी अंतर्गत वादामुळे तिरथसिंह रावत यांना आमदारकीचे तिकीटही नाकारण्यात आले होते. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. अशा वेळी भाजपच्या नेत्यांनी उत्तराखंडची जबाबदारी तिरथसिंह रावत यांच्याकडे दिली आहे. राज्याच्या राजकारणात तिरथसिंह रावत यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनच पाहिलं गेलं. पण पक्षांतर्गत राजकारणात टिकू न शकल्याने त्यांना कायम डार्क हॉर्सचीच भूमिका पार पाडावी लागली.

तिरथसिंह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. अमित शहा यांनी २०१६-१७ मध्ये देशातील विविध भागांत १२० दिवस यात्रा केली होती. तेव्हा तिरथसिंह रावत हे त्यांच्यासोबत कायम होते. २०१७ मध्ये जेव्हा तिरथसिंह यांना आमदारकीचं तिकीट मिळालं नाही तेव्हा अमित शहा यांनी त्यांना हिमाचलप्रदेशात भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती केली.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत तिरथसिंह यांना गढवालमधून तिकीट दिलं आणि ते संसदेत पोहचले. गढवाल लोकसभा मतदारसंघ हा अति विशेष मानला जातो. कारण याच मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री बी. सी. खंडुरी निवडणूक लढवतात.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी निवड झाल्यानंतर रावत यांनी माध्यमांशी चर्चा केली. मी संघासाठी काम करत होतो. भाजपमध्ये येण्याचा कधीच विचार केला नव्हता. परंतु अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून प्रेरणा घेऊनच मी सक्रिय राजकारणात उतरलो. माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यासोबत मी दीर्घकाळ काम केलं होतं. आधी संघप्रचारक म्हणून काम केलं. त्यानंतर पार्टी आणि सरकारच्या स्तरावर काम केलं. आजही त्रिवेंद्रसिंह रावत आपले मार्गदर्शक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER