अमित शहांचे मोठे विधान: महाराष्ट्रातील ‘ठाकरे’ सरकार स्वतः कोसळणार, राष्ट्रवादीसोबत युतीचेही संकेत

Maharashtra Today

नवी दिल्ली: एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढले असल्याने आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. ऑक्सिजन, रेमडीसीवीर इंजक्शनच्या तुटवड्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला आहे. आणि अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय स्थितीवर मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मी हे सरकार अभद्र युतीने स्थापन झाल्याचे म्हणत आहो. हे सरकार आपल्याच कर्माने कोसळणार आहे. तसेच भविष्यात सरकार स्थापन झाल्यास कोणत्या पक्षाला सोबत घेऊ हे आताच सांगू शकत नसल्याचे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीचे संकेतही दिलेत. शहा यांनी टाइम्स नाऊ(Times Now) या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना शहा म्हणाले की, भाजप-शिवसेना (BJP-Shivsena)अनेक वर्षांपासून सोबत होती. शिवसेना आमच्या सरकारमध्ये आणि तिकीट वाटपामध्ये सहयोगी पक्ष होता. मात्र विधानसभेच्या निकालानंतर केवळ मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. मात्र हे अभद्र सरकार आहे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत आहो. हे सरकार पाडण्याचे आमच्याकडून कुठलेही प्रयत्न होणार नाही. ते आपल्याच कर्माने कोसळेल, असा दावा अमित शहा यांनी केला.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची वसुली करण्याचा आरोप केला होता. त्याची सध्या सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. यावर भाष्य करताना ते म्हणाले की, सत्ताधारी पक्ष सीबीआय आणि फडणवीस इन्व्हिस्टिगेशन ब्युरो चौकशी करत असल्याचे सांगत आहेत. मुळात देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेत्याचे काम चोखपणे बजावत आहेत. ते सगळ्या गोष्टी उघड करत आहेत. ते त्यांचं काम आहे, असेही अमित शाह म्हणाले.

यावेळी शहा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या अस्थिरतेवर भाष्य करताना सांगितले की, आम्ही हे सरकार पडण्याची वाट बघू. त्यानंतर राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवण्याचे आता सांगू शकत नाही. ते सरकार पडल्यानंतर बघू, असे सूचक विधानही त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button