अवैध घुसखोरांना देशाबाहेर काढणारच- अमित शहा

Amit Shah In Rajyasabha

आसाममध्ये लागू करण्यात येत असलेली राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) प्रक्रिया देशभर लागू करून भारतात घुसखोरी करून अवैधरीत्या राहणाऱ्यांना देशाबाहेर काढण्यात येईल, अशी ग्वाही १७ जुलैला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. देशातील इंच इंच जमिनीवरून घुसखोरांना हुसकावण्यात येईल, असा निर्धार अमित शहा यांनी व्यक्त केला.


नवी दिल्ली : आसाममध्ये लागू करण्यात येत असलेली राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) प्रक्रिया देशभर लागू करून भारतात घुसखोरी करून अवैधरीत्या राहणाऱ्यांना देशाबाहेर काढण्यात येईल, अशी ग्वाही १७ जुलैला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. देशातील इंच इंच जमिनीवरून घुसखोरांना हुसकावण्यात येईल, असा निर्धार अमित शहा यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायद्याबाबत सध्या देशात, मुख्यतः बंगाल, आसाममध्ये वाद निर्माण झाला आहे. आसाम करारानुसार आसाममधील ४० लाख लोकांचे वास्तव्य अवैध ठरवणाऱ्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर देशातील अन्य राज्यांमध्येही एनआरसीसारखी प्रक्रिया अमलात आणण्याचा सरकारचा विचार आहे काय आणि त्यात किती राज्यांचा समावेश असेल, असा सवाल समाजवादी पक्षाचे सदस्य जावेद अली खान यांनी केला. खान यांनी चांगला प्रश्न विचारला आहे, अशी प्रशस्ती देत अमित शहा यांनी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या भाषणाकडे लक्ष वेधले. ज्या निवडणूक जाहीरनाम्याच्या आधारावर केंद्रात मोदी सरकार दुसऱ्यांदा निवडून आले आहे, त्यातही एनआरसीचा उल्लेख करण्यात आला आहे.

भारतात घुसखोरी करून शिरलेले अवैध लोक राहतात त्यांची ओळख पटवण्यात येईल आणि त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार देशाबाहेर काढण्यात येईल, असे शहा यांनी स्पष्ट केले. राज्यसभेने बुधवारी (१७ जुलैला ) एनआयए विधेयक एकमताने मंजूर केले. राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) या विधेयक मंजुरीमुळे आणखी अधिकार मिळणार आहेत. यामुळे विदेशात राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षितता धोक्यात येत असल्यास तसेच त्यांच्यावर दहशतवाही हल्ले होत असल्यास थेट चौकशी करण्याचे अधिकार एनआयएला मिळणार आहेत.