अमित शहा यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

amit shah

नवी दिल्ली : लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. लॉकडाऊन असतानाही देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी भर पडत असल्याने लॉकडाऊन वाढवायचा का यासंबंधी राज्यांशी बोलून केंद्र सरकारचे विचारमंथन सुरू असल्याचे कळते. याच पार्श्वभूमीवर केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधला आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी लॉकडाऊन पुढे वाढवण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांशी बोलताना अमित शाह यांनी राज्यांमध्ये चिंता वाटणारी ठिकाणे तसंच १ जूनपासून सुरु केली जाऊ शकतात अशी कोणती क्षेत्रं आहेत यासंबंधी माहिती जाणून घेतली असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्याआधी दरवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली आहे. अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत अमित शाह नेहमी हजर असायचे.

बैठकीतील सविस्तर माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, अनेकांनी सर्वसामान्य जीवन सुरळीत व्हावं तसंच अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी काही निर्बंध शिथील करत लॉकडाउन सुरु ठेवावा असं मत व्यक्त केल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. केंद्र सरकार पुढील तीन दिवसात लॉकडाउनसंबंधी निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER