अमित शहांनी राणेंच्या पत्राला केराची टोपली दाखवली, विनायक राऊतांचा पलटवार

Amit Shah - Narayan Rane - Vinayak Raut - Maharashtra Today

सिंधुदुर्ग : सध्या महाराष्ट्रात सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरण चांगलंच गाजत आहे. राज्यात रक्षकच भक्षक झाले असून त्यांना राज्य सरकारचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी काल केला होता. तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्याबाबतचं पत्रं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पाठवलं असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. आणि यावरुन शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीका केली. राणे यांचं हे पत्रं शहा यांनी केराच्या टोपलीत फेकून दिलं आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

यावेळी राऊत म्हणाले की, नाराणय राणेंना कुठलाच कामधंदा उरलेला नाही. भाजपने (BJP) सुद्धा त्यांना बाजूला सारले आहे. अमित शहा यांनीही त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही. त्यांचं पत्रं केऱ्याच्या टोपलीत फेकून दिलं आहे. राणेंना धड हिंदी बोलता येत नाही. इंग्रजीचा तर त्यांना कळतच नाही. त्यामुळे दिल्लीत जाऊन करायचं काय? तर असं काही तरी पत्रं द्यायचं. त्यामुळे त्यांनी हे पत्रं दिलं. इतकंच काय ते या पत्राचं महत्त्व आहे. केवळ कुठे तरी बातमी छापून येण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी राणेंची ही धडपड आहे, अशा शब्दात राऊत यांनी राणेंवर प्रहार केला.

राणे हे एक अतृप्त राजकीय नेते आहेत. त्यांचा नेहमीच मुख्यमंत्रीपदाची लालसा राहिलेली आहे. मुख्यमंत्रीपदाचं त्यांचं स्वप्न यशस्वी झालं नाही आणि भविष्यातही होणार नाही, असा चिमटा काढतानाच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही. तशी परिस्थिती येणारही नाही, असंही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER