युतीसाठी अमित शहांचा पुढाकार, २२ तारखेला उद्धव ठाकरेंची भेट घेणार?

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांची आघाडी ठरली आहे, असून जागावाटपाचा तिढाही सुटल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये आद्यपही जागावाटपाच्या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेकडून ‘फिफ्टी–फिफ्टी’चा फॉर्म्युला समोर केला जात आहे. तर भाजप एवढ्या जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे पुढाकार घेणार असल्याचे वृत्त एका मराठी वाहिनीने प्रसारित केले आहे.

ही बातमी पण वाचा : म्हणे ‘फिफ्टी-फिफ्टी’ फॉर्म्युला मीडियाने पसरविला; उद्धव ठाकरे यांचे घूमजाव

अमित शाह हे २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. कलम ३७० संदर्भात गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर याच दिवशी ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेऊन जागावाटपाचा तिढा सोडवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर भाजपकडून शिवसेनेला २२ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.

दरम्यान, शिवसेनेला विधानसभेसाठी १४४ जागा न मिळाल्यास युती तुटण्याची शक्यता आहे. असे विधान शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी केले होते. त्यानंतर आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून देखील भाजप-शिवसेना युती तुटण्याचे संकेत मिळाले आहेत. जर शिवसेनेला २४४ पैकी १४४ जागा न मिळाल्यास युती तुटू शकते, असे विधान राऊत यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : युतीचा फॉर्म्युला बनला सस्पेन्स