केंद्राच्या कार्यालयात मराठीच्या वापरावर लक्ष देण्याचे अमित शाहांचे आश्वासन

Amit Shah-subhash desai

मुंबई : महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या अखत्यारितील विभागांमध्ये त्रि-भाषा सुत्रानुसार मराठी भाषेचा वापर करण्यात यावा, अशी मागणी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना केली असून याप्रकरण माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासनही अमित शाह यांनी पत्राद्वारे दिले आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीयकृत बँका, पश्चिम आणि मध्य रेल्वे यामध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याच्या अनेक तक्रारी राज्य शासनाकडे दाखल झाल्या असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे. दरम्यान केंद्राने याकडे लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने केंद्रीय कार्यालयात मराठीचा वापर होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 नुसार मराठी ही राज्याची अधिकृत भाषा आहे. केंद्र शासनाने राजभाषा नियम 1967 चे धोरण अंगीकारले आहे. त्याद्वारे राज्याच्या अखत्यारितील केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांना त्रि-भाषा सूत्र लागू केलेले आहे. परंतू राष्ट्रीयकृत बँका, पश्चिम आणि मध्य रेल्वे, टपाल आदी कार्यालयात या सूत्रांची अंमलबजावणी होत नसल्याची बाब सुभाष देसाई यांनी केंद्राच्या लक्षात आणून दिली आहे.