नागराजच्या फॅक्टरीत जमणार अमेय – अक्षयाची जोडी

Amey Wagh - Akshaya Gurav

मराठी सिने इंडस्ट्रीत नागराज मंजुळेच्या पुढच्या सिनेमाची उत्सुकता नेहमीच लागून राहिलेली असते. मग ती फॅन्ड्री असो पिस्तुल्या असो सुपर डुपर हिट ठरलेल्या सैराट असो किंवा त्यांनी अभिनय केलेला सिनेमा नाळ असो. त्यातून काहीतरी भन्नाट बाहेर येणार आणि प्रेक्षकांसाठी ती पर्वणी असणार हे आता समीकरणच झालं आहे. नेहमीपेक्षा हटके विषय शोधायचा आणि त्याला गावरान टच देत प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणायची नस नागराजला बरोबर सापडली आहे. आता लवकरच नागराज मंजुळेच्या फॅक्टरीत अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) आणि अक्षया गुरव (Akshaya Gurav) यांची जोडी जमणार आहे. अर्थात अजूनही हा नेमका सिनेमा कसा असेल आणि त्याचं नाव काय असेल या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या नसल्या तरी सिनेमाच्या शूटिंगची लगबग पुण्याच्या आसपास असलेल्या लोकेशनवर सुरू झाली आहे. अमेय आणि अक्षया ही आजपर्यंत कधीही एकत्र न दिसलेली जोडी नागराजच्या तालमीतून कशी काय पडद्यावर येणार हे पाहण्यासाठी या दोघांचेही चाहते आतुर झाले आहेत.

फॅन्ड्री, पिस्तुल्या यासारख्या सिनेमातून समाजातल्या वैचारिक व्यंगावर बोट ठेवणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळे याने सैराट हा सिनेमा पडद्यावर आणला आणि सगळीच गणित त्याच्या सूत्राप्रमाणे मांडली. आजपर्यंत कधीही कॅमेऱ्यासमोर उभे राहिलेले नाहीत अशा नवख्या कलाकारांना घेऊन तयार केलेला सिनेमा शंभर कोटींच्या घरात जाऊ शकतो हे नागराज मंजुळेने दाखवून दिलं. साधीच, तुमच्या आमच्या आजूबाजूला घडणारी एक गोष्ट दिग्दर्शक म्हणून कॅमेऱ्यासमोर मांडण्याचे कसब नागराजकडे आहे. दिग्दर्शनाबरोबरच नाळ या सिनेमातील नागराजचा अभिनय भाव खाऊन गेला. आता अनलॉकनंतर सिनेमाच्या निर्मितीला बहर आला आहे त्यामुळे नागराजनेही अॅक्शन म्हणण्याची तयारी केली आहे.

सोशल मीडियावर सतत ॲक्टिव असलेला आणि एकसेएक भन्नाट कॅप्शन देत फोटो शेअर करणारा अभिनेता अमेय वाघ याने, लवकरच नागराजच्या फॅक्टरीत असं सांगत पोस्ट केली आहे. अक्षया गुरव हीदेखील बऱ्याच दिवसापासून कॅमेरा पासून लांब आहे. लग्नानंतर ती संसाराला वेळ देण्यासाठी ती या सगळ्याच माध्यमांपासून थोडीशी अलिप्त होती. पण आता तिलाही एक वेगळी संधी नागराजच्या नव्या सिनेमाने देऊ केली आहे. मोजकं पण नेमके काम करणाऱ्या कलाकारांच्या यादीत असलेल्या अमेय वाघ सोबत अक्षया पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. अमेय याची सिनेमा मालिका आणि नाटक या तीनही माध्यमात हुकुमत आहे . दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील त्याची भूमिका तरुणाईमध्ये प्रचंड गाजली होती. तर त्याचा मुरांबा हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा देखील तरुण प्रेक्षकांना भावला होता. अमर फोटो स्टुडिओ या नाटकातही अमेयची अभिनयगिरी पाहायला मिळाली. फास्टर फेणे या सिनेमातील त्याचा सहज सुंदर वावर हे त्याच्या अभिनय कौशल्याचं उदाहरण म्हणता येईल.

अक्षया गुरवने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये कधी सोज्ज्वळ सून तर कधी खाष्ट मुलगी अशा अनेक छटा रंगवल्या आहेत. लव लग्न लोच्या या मालिकेतील भुमिका वठवल्यानंतर अक्षया नव्या व्यक्तिरेखेच्या शोधात होती. नागराज मंजुळेच्या सिनेमात अमेय वाघ सोबत झळकण्याची संधी तिला आता या नव्या सिनेमामध्ये मिळणार आहे.

सध्या या सिनेमाचे पहिल्या टप्प्यातील शूटिंग पुणे परिसरातील नैसर्गिक ठिकाणी करण्यात येत आहे. यासाठी अक्षया आणि अमेय ही जोडी सिनेमातील केमिस्ट्री अधिक कशी जुळवता येईल यावर काम करत आहे. सध्यातरी या सिनेमाबद्दल कमालीची गोपनीयता पाळण्यात आली असून हा सिनेमा ग्रामीण आहे की शहरी हे स्पष्ट झालेलं नाही. पण जर नागराज मंजुळे याच्या नजरेतून हा सिनेमा पडद्यावर येत असेल तर त्याला नक्कीच मातीतला एक असतो. त्यामुळे जर हा सिनेमा ग्रामीण बाजाचा असेल तर अमेय आणि अक्षया या दोघांनाही गावाकडचं प्रेमीयुगुल म्हणून पाहणं रंजक ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER