अखेर अमेरिका नमला, जो बायडन यांची मोठी घोषणा; लसीसाठी भारताला कच्चा माल पुरवणार

Maharashtra Today

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून लसींसोबतच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अनेक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. पहिल्या लाटेत इतर देशांच्या मदतीला धावणाऱ्या भारताला सध्या मात्र इतर देशांच्या मदतीची गरज भासत आहे. या दरम्यान अमेरिकेच्या गरजा भागल्याशिवाय कुठलीही मदत देता येणार नाही अशी भूमिका अमेरिकेने लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्याबाबतच्या मागणीवर घेतली होती. मात्र भारतीय अमेरिकी लोकांच्या वाढत्या दबावानंतर अमेरिकेनेही भारताला कोरोनाच्या लढ्यात साथ दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden)आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी कोरोनाशी लढण्यासाठी भारताला आणि भारतीयांना वैद्यकीय साहित्यासोबतच सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. जो बायडन यांनी ट्विट केलं असून, “ज्याप्रमाणे भारताने अमेरिकेला कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सर्व रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती असताना मदत केली त्याचप्रमाणे आम्ही भारताला गरज असताना मदत करण्याचं ठरवलं आहे. ” असं म्हटलं आहे.

जो बायडन भारतातील स्थितीचा वारंवार आढावा घेत आहेत. या दरम्यान कमला हॅरिस यांनीदेखील ट्विट केलं आहे. “कोरोनाच्या संकटात भारताला वेगाने अतिरिक्त मदत आणि पुरवठा करण्यासाठी अमेरिकन सरकार भारतीय सरकारसोबत संपर्कात आहे. मदत करत असताना आम्ही धाडसी आरोग्य कर्मचाऱ्यांसहित सर्व भारतीय नागरिकांसाठी प्रार्थना करत आहोत. ” असं कमला हॅरिस यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेनं भारताला लसीनिर्मितीसाठी कच्चा माल देण्याचं मान्य केलं आहे. बायडेन प्रशासनाकडून भारताला ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval)यांना ही माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान (Jack Sullivan) यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवर बोलताना सांगितले की, कोविड -१९ संदर्भात नुकत्याच झालेल्या तणावाच्या घटनेनंतर भारतीय लोकांबद्दल तीव्र सहानुभूती आहे. सुलिवान यांनी अमेरिकेची भारताशी एकता असल्याचे प्रतिपादन केले. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध सात दशकांपासून आहेत. आरोग्यविषयक गोष्टींची घेवाण-देवाण सुरू आहे. मातारोग, पोलिओ आणि एचआयव्हीविरुद्ध दोन्ही देशांनी एकत्र लढा दिला आहे. त्यांनी निर्धार केला की, भारत आणि अमेरिका एकत्रितपणे जागतिक कोविड -१९ महामारीसोबत लढा देत राहतील. सुरुवातीच्या काळात जशी अमेरिकेला मदत पाठविली गेली तशीच अमेरिकेने गरजेच्या वेळी भारताला मदत करण्याचा निर्धार केला आहे.

अमेरिकेच्या नेतृत्वावरून भारताला मदत करण्यासंबंधी पहिल्यांदाच अधिकृत वक्तव्य आलं आहे. नव्या निर्णयानुसार अमेरिकेने भारताला पीपीई किट, रॅपिड टेस्टिंग कीट, ऑक्सिजन जनेरशन संदर्भात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेच्या आरोग्य खात्याचं तज्ज्ञांचं पथकही भारतात येणार आहे. हे पथक भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत भारतातील कोरोना कमी करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणार आहे.

भारतानं लसीच्या कच्च्या मालासाठी अमेरिकेकडे मदत मागितली होती. पण जो बायडन प्रशासनानं अमेरिका फर्स्ट अशी भूमिका घेत भारताला कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्यास असमर्थतता दर्शवली. यानंतर विविध स्तरांतून अमेरिकन सरकारवर दबाव वाढला. ऍस्ट्राझेनेकासह अन्य कोरोना लसी आणि जीवनरक्षक औषधं त्वरित भारताला पाठवण्याची मागणी यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्सनं केली. यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्स अमेरिकेतील शक्तिशाली संस्था मानली जाते. या संस्थेसोबतच काही अमेरिकन खासदार आणि प्रभावी भारतीय अमेरिकी व्यक्तींनीदेखील भारताला तातडीनं मदत देण्याची मागणी बायडन प्रशासनाकडे केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button