अंबरनाथ हादरलं : मनसे शहर उपाध्यक्षाची चार हल्लेखोरांकडून हत्या

MNS - Rakesh Patil

अंबरनाथ :- मनसेचे (MNS) अंबरनाथ (Ambernath) शहर उपाध्यक्ष राकेश पाटील (Rakesh Patil) यांची हत्या करण्यात आली. ते संध्याकाळी रिलायन्स रेसिडेन्सी (Reliance Residency) भागातील पटेल आर मार्टजवळ उभे होते. पालेगाव भागात अनेक इमारतींचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी काही कामानिमित्त गेलेल्या पाटील यांच्यावर चार जणांनी तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

यामध्ये पोटात आणि मानेवर वर्मी घाव बसल्याने राकेश गंभीर जखमी झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने आधी उल्हासनगरच्या एका खासगी रुग्णालयात नेले. तिथून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर तात्काळ अंबरनाथ पोलिसांनी (Ambernath Police) घटनास्थळी जाऊन पाहणी करून आरोपींचा शोध सुरू केला त्यानंतर पोलिसांनी ४ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली गाडी अंबरनाथमधील एका गावगुंडाच्या नावावर असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. हा गुंड अंबरनाथ शहरातील एका नामांकित बिल्डरसाठी काम करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मोठी नावे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पाटील यांनी अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीसाठी (Ambernath Municipal Corporation) कंबर कसली होती, त्याचबरोबर पालेगाव भागात नागरी समस्या घेऊन त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे ही हत्या राजकीय घडामोडीतून घडली आहे की इतर काही कारणातून याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER