इंदूमिल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध करण्याची प्रकाश आंबेडकरांची भूमिका निषेधार्ह – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

Ramdas Athawale

मुंबई : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी इंदूमिल ची जमीन मिळविण्यासाठी आंबेडकरी जनतेने प्रदिर्घ काळ संघर्ष केला.इंदूमिल मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक उंच पुतळा स्टॅच्यु ऑफ इक्वालिटी उभारण्यात यावा ही आंबेडकरी जनतेची मागणी आहे.त्यानुसार इंदूमिल मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि पुतळा उभारण्यात येणार आहे. मात्र त्यास आता प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. इंदूमिल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची आणि सुशोभिकरणाची गरज नसल्यामुळे त्याचा सर्व निधी वाडिया रुग्णालयाला द्यावा अशी आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारी आंबेडकरी जनतेच्या भावनांचा अवमान करणारी निषेधार्ह भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली असून त्यांच्या या भूमिकेचा तीव्र विरोध आपण करीत असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या महानगरात ; देशाच्या आर्थिक राजधानीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक व्हावे ही संपूर्ण आंबेडकरी जनतेची ईच्छा आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे युगपुरुष क्रांतिसूर्य ठरले असून त्यांनी उभारलेला समतेचा लढा मानवमुक्तीचा लढा संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 450 फूट उंच पुतळा स्टॅच्यु ऑफ इक्वालिटी म्हणून जगाला प्रेरणा देणारा आणि देशाला अभिमानस्पद ठरणार आहे.

त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध करणारे प्रकाश आंबेडकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत की कोण आहेत? असा प्रश्न पडतो. त्यांच्या मनात संकोच असंतोष कसला आहे .डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध करून प्रकाश आंबेडकर आंबेडकरी जनतेच्या भावनांचा अवमान करीत आहेत. त्यांनी अशी समाज विरोधी भूमिका घेतल्याबद्दल आंबेडकरी जनतेने प्रकाश आंबेडकर यांना जाब विचारला पाहिजे. असे तीव्र नाराजी ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

प्रकाश आंबेडकर जरी काही म्हणत असले तरी आंबेडकरी समाजाची इंदूमिल मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक आणि पुतळा उभारावा ही इच्छा आहे. यापूर्वीच्या सरकारने इंदूमिल मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यासाठी काम केले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने येत्या दोन वर्षांत इंदूमिल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्मारकाचे उदघाटन करावे यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. इंदूमिल मधील स्मारकाचे जेंव्हा भूमिपूजन झाले होते तेंव्हा प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. आता मात्र ते या स्मारकाचा; पुतळ्याचा निधी वाडिया रुग्णालयाला वर्ग करण्याची दुटप्पी भूमिका मांडत आहेत. आंबेडकरी समाजाने मात्र जागृत राहून इंदूमिल मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी आग्रही राहावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

वाडिया रुग्णालयाला मदत प्राधान्याने दिली पाहिजे याबद्दल आमचे दुमत नाही मात्र त्यासाठी डॉ बाबासाहेब अंबेडकरांच्या पुतळ्याच्या उंचीवरून न्यायालयाने टिप्पणी करणे योग नव्हते न्यायालयाचा आम्ही आदर करतो मात्र मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या अनावश्यक टिप्पणी बाबत चे पत्र आपण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बोबडे यांना पाठविणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी कळविले आहे.