आंबेडकरांनी मी केलेली चूक सांगावी, घरी जाऊन माफी मागेन – इम्तियाज जलील

औरंगाबाद : राज्यातील जनता आता भाजप आणि काँग्रेसला कंटाळली असून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमकडे दुसरा मोठा पर्याय म्हणून पाहत होते. प्रकाश आंबेडकरांनी आताही ओवेसींना एक फोन केला तर आघाडी बाबात फेरविचार होऊ शकतो. आंबेडकरांनी माझ्याशी चर्चा न करण्याची भूमिका का घेतली? त्यांनी माझी चूक सांगावी मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन आणि जाहीर सभेत देखील माफी मागेन, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीसोबत एमआयएमची काडीमोड होण्याला इम्तियाज जलील यांना जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. यावर पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देतांना इम्तियाज जलील म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत आदर आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत युती करतांना एमआयएमने जो प्रस्ताव बाळासाहेबांकडे दिला होता, त्यावर लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून निवडणूकीच्या तयारीला लागतील एवढा एकच फोन मी त्यांना केला होता.

परंतु त्यानंतर आंबेडकरांनी मी इम्तियाज जलील यांच्याशी आघाडी संदर्भात बोलणार नाही अशी भूमिका घेतली. त्यांनी ही भूमिका का घेतली? हे मला अद्यापही कळालेले समजले नाही. त्यांनी माझी चूक सांगावी मी त्यांची घरी जाऊन आणि जाहीर सभेत देखील माफी मागायला तयार आहे. वंचित सोबतची बोलणी आम्ही रोखून आघाडी तोडली हा प्रकाश आंबेडकरांचा आरोप खरा आहे. पण आम्हाला केवळ आठ जागा देण्याची तयारी त्यांनी दाखवल्यानंतर आमच्या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सहमतीने निर्णय घेऊनच मी प्रसिध्दी पत्रक काढले होते.

पण आम्हाला केवळ आठ जागा देण्याची तयारी आंबेडकरांनी दाखवल्यानंतर आमच्या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सहमतीने निर्णय घेऊनच मी प्रसिध्दी पत्रक काढले होते. वंचित सोबतच्या आघाडीच्या आशा अजूनही कायम आहेत, फक्त त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेऊन ओवेसींना फोन करावा, हैदराबादेत जाऊन चर्चा केली तर अर्ध्या तासात मार्ग निघू शकतो. पण प्रकाश आंबेडकर आम्हाला आठ जागा देण्याच्या निर्णयावर जर ठाम राहिले तर मात्र आमचा नाईलाज असेल असेही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

हैदराबाद मराठवाडा मुक्तिसंग्राम हा एक इतिहास होता तो घडून गेला. त्यावरून आता राजकारण करणे आणि आमच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न निर्माण करणेही चुकीचे आहेत. आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. माझ्या अनुपस्थिती वरून रान पेटवणाऱ्यांनी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेचे गुलाबराव पाटील, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हेदेखील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला आपापल्या जिल्ह्यात हजार नव्हते. त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही. मुळात या मुद्यावरून सुरू झालेले राजकारण त्या लोकांची मानसिकता दर्शवतात मला यापेक्षा शहराच्या विकासाला प्राधान्य द्यायचे आहेत. कारण लोकांनी मला विकासासाठी निवडून दिले आहे. असेही ते म्हणाले.