अंबानी, रामदेवबाबांना दिलेल्या भूखंडांवर उद्योग कधी उभारणार? नाना पटोलेंचा सवाल

मुंबई :- योगगुरू रामदेवबाबा आणि अनिल अंबानी (Anil Ambani) यांना राज्य सरकारने उद्योग उभारण्यासाठी भूखंड दिले  होते. त्या भूखंडांवर उद्योग कधी उभे राहणार? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. पटोले यांच्या नव्या आरोपावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. विधानसभेत नाना पटोले यांनी सवाल केला होता. रामदेवबाबांच्या पतंजली समूहाच्या हर्बल अँड फूड पार्कसाठी तसेच अनिल अंबानी यांना नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी नाममात्र दराने भूखंड वाटप करण्यात आले होते.

मात्र, या जागेवर अद्याप उद्योग उभारले नाहीत. शेतकऱ्यांची लाखमोलाची जमीन कवडीमोल भावाने देऊनही त्यावर उद्योग उभारले नाहीत.  उद्योग कधी उभारणार? असा सवाल पटोले यांनी केला. “मिहान प्रकल्पामधील २३० एकर जमिनीवर रामदेवबाबांचा पतंजली समूह हर्बल अँड फूड पार्कची निर्मिती करणार होते.

रामदेवबाबांना ही जमीन ६६ वर्षांसाठी अतिशय कवडीमोल भावात दिली. या उद्योगामुळे ५० हजार रोजगारनिर्मिती होईल, तसेच रोज पाच  हजार कोटींचा कच्चा माल खरेदी केला जाईल, असा दावा करण्यात आला होता. चार वर्षे झाली तरीही या जागेवर पतंजलीचा उद्योग उभा राहिलेला नाही. अनिल अंबानी यांच्या रिलायंस डिफेन्स कंपनीसाठीही मिहानमध्ये २८९ एकर जमीन देण्यात आली.

या उद्योगातूनही प्रत्यक्ष दोन  हजार तर अप्रत्यक्ष १५ हजार रोजगारनिर्मिती होईल, असा दावा करण्यात आला होता; पण हा प्रकल्पही उभा नाही.” असे पटोले म्हणाले. रामदेवबाबा, अनिल अंबानींसह ज्या कोणाला उद्योगनिर्मितीसाठी सरकारने जमिनी उपलब्ध करून दिल्या; पण त्या जागेवर उद्योग उभारले नाहीत. त्याची माहिती घेऊन कारवाई करू, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिले.

ही बातमी पण वाचा : शिवसेना-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर नाना पटोलेंचा संताप अनावर 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER