अमेझॉन प्राईम व्हीडियोही सिनेनिर्मितीच्या क्षेत्रात, अक्षयकुमार सोबत करणार ‘रामसेतू’ची निर्मिती

आजपासून अयोध्येत होणार शूटिंग सुरु

बॉलिवूडचा (Bollywood News) मोह हॉलिवूडलाही आहे. त्यामुळेच हॉलिवूडच्या अनेक कंपन्या त्यांचे सिनेमे भारतातील विविध भाषांमध्ये डब करून प्रदर्शित करतात. तर काही निर्माते भारतात येऊन त्यांच्या सिनेमांचे शूटिंग करतात. हॉलिवूडच्या काही मोठ्या कंपन्यांनी तर हिंदी सिनेनिर्मितीलाही सुरुवात केली होती. पण येथील काही लोकांमुळे या कंपन्यांनी सिने निर्मितीपासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे थिएटर बंद असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि ओटीटी प्लॅटफॉर्मकडे प्रेक्षकांचा ओढा वळला. या प्रेक्षकांना टिकवून ठेवण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मनी मोठ्या कलाकारांना घेऊन वेब सीरीज तयार केल्या तसेच अनेक तयार सिनेमेही विकत घेतले आणि दाखवले. आता तर ओटीटी प्लॅटफॉर्म स्वतः सिने निर्मितीतही उतरणार आहे. अमेझॉन प्राईम व्हीडियोने (Amazon Prime Video) मंगळवारी सिने निर्मितीत उतरणार असल्याची घोषणा केली आहे. अक्षयकुमारच्या (Akshay Kumar) बहुचर्चित राम सेतू सिनेमाचे सहनिर्माते म्हणून अमेझॉन पुढे आली आहे.

थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या सिनेमांची निर्मिती अमेझॉन करणार आहे. त्याची सुरुवात ‘राम सेतू’ पासून ते करीत आहेत. या सिनेमाची निर्मिती प्राइम व्हीडियो, केप ऑफ गुड फिल्म्स, एबंडेंशिया एंटरटेनमेंट आणि लायका प्रोडक्शन यांच्यासोबत मिळून करणार आहे. राम सेतू हा अक्षय कुमारचा महत्वाकांक्षी सिनेमा असून गेल्या वर्षी त्याने या सिनेमाची घोषणा केली होती. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करीत असून डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून सिनेमाशी जोडले गेलेले आहेत. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यशराज बॅनरअंतर्गत तयार होत असलेल्या ऐतिहासिक ‘पृथ्वीराज’ सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत. या सिनेमात अक्षयकुमार पृथ्वीराज यांची भूमिका साकारीत आहे. या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेसच डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी आणि अक्षयकुमार यांच्यात ‘राम सेतू’बाबत चर्चा झाली आणि त्यांनी लगेचच या सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. ‘राम सेतू’ हा एक अॅक्शन-अॅडव्हेंचर ड्रामा असून यात भारताची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा दाखवण्यात येणार आहे. या सिनेमात अक्षयकुमारसोबत जॅकलीन फर्नांडीस आणि नुसरत भरूचा यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे.

अमेझॉनने सहनिर्माता होण्यास तयारी दर्शवल्यानंतर अक्षय कुमारने सांगितले, “राम सेतू’ची कथा अशा काही मोजक्या कथांपैकी एक आहे ज्यांनी मला खूपच प्रेरित केले आणि माझ्या मनात नेहमीच कुतुहल निर्माण केले होते. ही कथा शक्ती, शौर्य आणि प्रेमाचे प्रतिनिधित्व करणारी असून यात भारतीय मूल्यांना सादर केले जाणार आहे. ही ती मूल्ये आहेत ज्यामुळे भारत देश महान बनला आहे. ‘राम सेतू’ भूत, वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांमधील पूल आहे. आजच्या तरुणांना ही कथा सांगणे आवश्यक आहे. या सिनेमाच्या निर्मितीत अमेझॉनही सहभागी होत आहे त्याचा मला आनंद आहे. असेही अक्षयने म्हटले. या सिनेमाचा मुहुर्त आज म्हणजे १८ मार्चला अयोध्येत केला जाणार असून सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER