क्रिकेटमधील ‘हा’ योगायोग तुम्हाला थक्क करेल!

क्रिकेट हा वेगवेगळ्या विक्रमांचा आणि अविश्वसनीय योगायोगांचा खेळ आहे. पण २८ डिसेंबरला सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीबाबत घडून आलेला योगायोग तर तुम्हाला थक्क करेल. एवढ्या गोष्टी योगायोगाने सारख्याच कशा घडून येतात याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण खरोखरच हे घडले आहे आणि त्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. विषय सचिन तेंडुलकर व विराट कोहली यांनी आस्ट्रेलियाविरुद्ध पूर्ण केलेल्या एक हजार कसोटी धावांचा आहे.

आता यातील योगायोग पाहा :

  • 1) 28 डिसेंबर- या दोघांनी एकाच दिवशी हा टप्पा गाठला. सचिनने 1999 मध्ये तर विराटने 2014 मध्ये!
  • 2) दोघांचाही आस्ट्रेलियाविरुध्दचा हा 11 वा कसोटी सामना आणि 19 वा डाव होता.
  • 3) यावेळी दोघांचेही वय सारखेच म्हणजे 26 वर्षे होते.
  • 4) दोघांनीही आस्ट्रलियाविरुध्द सारखीच- पाच शतके आणि दोन अर्धशतके झळकावलेली होती.
  • 5) दोघांनीही हजार धावांचा टप्पा गाठताना शतक झळकावले होते. सचिनने 116 धावांची तर कोहलीने 169 धावांची खेळी केली होती.
  • 6) दोन्ही वेळा त्या सामन्यातील भारताचा पहिला डाव होता आणि आस्ट्रेलियाचा पहिला डाव आटोपल्यावर भारतीय संघ फलंदाजी करत होता.
  • 7) या सामन्यात सचिनने केलेल्या 116 आणि 52 धावा तर विराटने केलेल्या 169 व 54 धावा हीच दोन्ही डावातील भारतातर्फे सर्वोच्च खेळी होती.
  • 8) सचिन आणि विराट, दोघांनीही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.
  • 9) दोघांनीही एमआरएफने प्रायोजित केलेल्या बटीनेच फलंदाजी केली होती.
  • 10) दोन्ही सामन्यात भारत व आस्ट्रेलियातर्फे प्रत्येकी एकेका खेळाडूने पदार्पण केले. 1999 मध्ये ब्रेट ली व हृषिकेश कानिटकर तर 2014 मध्ये जो बर्नस् व लोकेश राहूल यांचा हा पहिलाच सामना होता.

एवढ्या गोष्टी एकसारख्याच घडून आल्या तर फरक काय होता? फरक असा होता की 1999 मधील सामना आपण गमावला तर 2014 चा अनिर्णित सुटला. सचिन सामनावीर होता तर कोहली नव्हता आणि सचिन त्या सामन्यात कर्णधार होता तर कोहली नव्हता