‘मी काय पुण्यातच असतो!’ अजितदादांचा फडणवीसांना टोला

Ajit Pawar-Devendra Fadnavis

पुणे :  नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज एकाच व्यासपीठावर आल्याने या कार्यक्रमाची चर्चा जोरात चालली. तसेच, या कार्यक्रमात दोन्ही नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

त्यातच भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या गोंधळातच पुणे महापालिकेच्या भामा आसखेड प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी अजितदादांनी आपल्या शैलीत टोलेबाजी केली. विशेष म्हणजे, पुणे महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्यांनी या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनाही बोलवण्याची मागणी लावून धरली होती. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनाच बोलावले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे सुवर्णमध्य म्हणून दोन्ही नेत्यांना बोलवण्यात आले. या वादावर अजित पवार म्हणाले की, ‘मी महापौरांना सांगितलं होतं, विरोधी पक्षनेत्यांच्या सोयीच्या वेळेनुसार कार्यक्रम घ्या.

मी काय पुण्यातच असतो’ असं म्हणत अजितदादांनी फडणवीस यांना टोला लगावला. ‘पुण्याच्या विकासकामांसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. विकासकामांसाठी एकत्र येऊ, तशी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी  शिकवणूक दिली आहे’ असं पवार म्हणाले. तसंच, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली आहे. त्यामुळे जम्बो हॉस्पिटल आजपासून तात्पुरतं बंद करत आहोत, गरज लागली तर परत सुरू करू, अशी माहितीही पवारांनी दिली.

फडवणीसांनी दिले अजित पवारांना चहाचे आमंत्रण

दरम्यान, आपल्या भाषणात बोलत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत जोरदार टोलेबाजी केली. ‘पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्कंठा नव्हती, तेवढी मीडियाला होती. दोन दिवसांपासून अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार म्हणून बातम्याच बातम्या ऐकायला मिळाल्या.

आता मी आणि दादा एकत्र येणार असलो की दोन दिवस बातम्या चालतात. आता आम्ही काय कुस्ती करणार की गाणे म्हणणार होतो? त्यामुळे अजितदादांनी एकतर माझ्याकडे चहाला यावे किंवा मला तुमच्याकडे बोलवावे, मीडियाला बातम्याच बातम्या मिळतील.’ असा टोला फडणवीस यांनी लगावला. पुणे महापालिकेच्या भामा आसखेड प्रकल्पाची पुणेकरांना नववर्षाच्या दिवशी ही भेट मिळाली आहे.

या प्रकल्पाच्या प्रश्नासाठी गिरीश बापट यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या  होत्या. पालिकेकडूनही चांगली योजना निर्माण झाली आहे. यापुढे पुण्याच्या प्रश्नासाठी काही अडचण जरी आली तरी तिजोरीच्या चाव्या  अजित पवार यांच्याकडेच आहे. त्यामुळे कुठे कमी पडणार नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : अजितदादा एकतर तुम्ही मला चहाला बोलवा किंवा तुम्हीच आमच्याकडे या; फडणवीसांची थेट ऑफर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER