एलिसा हिलीने मोडला धोनीचे विक्रम

Alyssa Healy - MS Dhoni

आॕस्ट्रेलियन (Australia) महिला क्रिकेट (Women Cricket) संघाची यष्टीरक्षक (Wicketkeeper) एलिसा हिली (Alyssa Healy) ही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक ठरली आहे. न्यूझीलंडविरुध्दच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात तिने लाॕरेन डाउनचा झेल घेत यष्टींच्या मागील यशाचा हा टप्पा गाठला आहे. या सामन्यात तिने पहिल्यांदा एक फलंदाज यष्टीचित केली आणि नंतर झेल घेतला.या दोन बळींसह तिने महेंद्रसिंग धोनीलाही (M.S. Dhoni) मागे टाकले.

तिच्या नावावर आता 42 झेल व 50 स्टम्पिंगसह 92 बळी आहेत आणि धोनीच्या नावावर 57 झेल व 34 स्टम्पिंगसह 91 बळी होते. या दोघांशिवाय टी-20 इंटरनॅशनलमध्ये 75 सुध्दा बळी इतर कोणत्याही यष्टीरक्षकाच्या नावावर नाहीत. सारा टेलर 74 बळींसह तिसऱ्या स्थानी आहे.

114 टी-20 इंटरनॅशनल खेळलेल्या एलिसा हिलीचा यष्टीरक्षक म्हणून हा 99 वा सामना होता. यातही तिने यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक सामने खेळायचा धोनीचा विक्रम मागे टाकला. धोनी हा यष्टीरक्षक म्हणून 98 टी-20 इंटरनॕशनल खेळला आहे.

हिलीच्या नावावर आता 50 स्टम्पिंग आहेत. एमी सॕटर्थवेट ही तीची 50 वी स्टम्पिंग ठरली. याप्रकारे टी-20 इंटरनॕशनलमध्ये स्टम्पिंगचे अर्धशतक करणारी ती दुसरीच यष्टीरक्षक आहे. केवळ सारा टेलर 51 स्टम्पिंगसह तिच्यापुढे आहे. पुरुषांमध्ये धोनीच्या नावावर सर्वाधिक 34 स्टम्पिंग आहेत.

तिचे 42 झेल हे महिला यष्टिरक्षकांमध्ये सर्वाधिक आहेत आणि एकूणच टी-20 इंटरनॅशनलमध्ये केवळ धोनी (57 झेल) व दिनेश रामदीन (43) हेच तिच्या पुढे आहेत.

विशेष म्हणजे एलिसाला ह्या विक्रमाची कल्पनाच नव्हती आणि सामन्यानंतर समालोचक जेंव्हा तिला धोनीबाबत प्रश्न विचारायला लागले तेंव्हा तिला हे विक्रम समजले.

ही फार चांगली कामगिरी असल्याचे म्हणत एलिसाने ह्या विक्रमी कामगिरीबद्दल प्रौढी न मिरवता म्हटले की, याचे खरे श्रेय आपल्याला संधी देणाऱ्या गोलंदाजांचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER