घुग्‍घूसच्‍या विकासासाठी सदैव वचनबध्‍द – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

बसस्‍थानक बांधकामाचे तसेच 27 कोटी रू किंमतीच्‍या उंच पुलाच्‍या बांधकामाचे भुमिपुजन

Min Mungatiwar at chandrapur (1)

चंद्रपूर :-  घुग्‍घूसच्‍या विकासासाठी मी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्‍ध करून दिला आहे. गेल्‍या वर्षी 2515 या लेखा शिर्षाअंतर्गत 2 कोटी रू. निधी उपलब्‍ध करून दिला असून 8 कोटी रू खर्चुन अत्‍याधुनिक बसस्‍थानक या शहरात बांधण्‍यात येत आहे. घुग्‍घूस येथील 10 ओपन स्‍पेसच्‍या विकासासाठी 5 कोटी रू. निधी आपण लवकरच मंजूर करणार असून घुग्‍घूस येथे सर्वसोयींनी युक्‍त स्‍टेडीयमचे बांधकाम सुध्‍दा करण्‍यात येणार असल्‍याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर जिल्‍ह्यातील घुग्‍घूस येथे विविध विकास कामांच्‍या भुमिपुजन सोहळ्यानिमित्‍त आयोजित जाहिर सभेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहराज्‍य मंत्री हंसराज अहीर, जिल्‍हा परिषदचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषदेचे समाज कल्‍याण सभापती ब्रिजभुषण पाझारे आदींची उपस्थिती होती.

27 कोटी रू किमतीच्‍या मोठ्या पुलाचे बांधकाम

चंद्रपूर वणी यवतमाळ रस्‍त्‍यावरील घुग्‍घूस गावाजवळ वर्धा नदीवर असलेला अस्तित्‍वातील पूल वाहतुकीसाठी अरूंद असल्‍यामुळे, दुसरा मोठा पूल अस्तित्‍वातील असलेल्‍या पूलाचे बाजूने बांधण्‍याचे ठरले आहे. या कामाची प्रशासकीय मान्यता रूपये 27.00 कोटी असून पूलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. सदर पूलाची लांबी 251.00 मीटर असून रूंदी 12.00 मीटर आहे. सदर पूलाचा बांधकाम कालावधी 18 महिने असून जानेवारी 2020 मध्‍ये पूलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. चंद्रपूर वणी रस्‍ता चार पदरी आहे, परंतु अस्तित्‍वातील पूल फक्‍त दोन पदरी असल्‍यामुळे नवीन पुलाचे बांधकाम केल्‍यास पुलावरूनसुध्‍दा चार पदरी वाहतूक सुरू होईल, अशी माहिती त्‍यांनी दिली.

यावेळी बोलतांना केंद्रीय गृहराज्‍य मंत्री हंसराज अहीर म्‍हणाले, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात हा जिल्‍हा विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर ठरला आहे. अनेक प्रकल्‍प, उपक्रम त्‍यांनी जिल्‍ह्यात राबविले आहेत. रस्‍ते विकास, पाणी पुरवठा सर्वच क्षेत्रात त्‍यांच्‍या नेतृत्‍वात जिल्‍ह्यात लक्षणीय कामगिरी सुरू आहे. केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून सुध्‍दा विविध विकास कामे या क्षेत्रात आम्‍ही केली आहेत.

यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी सुद्धा विचार व्यक्त केले. जाहीर सभेला नागरिकांची मोठ्या संख्‍येने उपस्थिती होती.